तिवरे धरण फोडणाऱ्या खेकड्याला अटक, पाकीस्थानचा हात असल्याचा पोलिसांचा संशय, अनेक खेकड्यांच्या शोध सुरु

(सह्याद्री बुलेटिन ) - महाराष्ट्राचे अंतर्यामी आणि श्रीमंत मंत्री तानाजी सावंत यांच्या अजब तर्कट पणामुळे चिपळूणमधील तिवरे धरण फोडणाऱ्या गुन्हेगारांचा शोध लागला असून ते खेकडे असल्याचे सिद्ध झाले आहे.

आज पहाटे फोर्स वन दहशतवादी पथक व लष्कराच्या मदतीने रत्नागिरी पोलिसांनी धडक कारवाही करत आरोपी खेकड्यांना अटक केली आहे. पोलिसांशी झालेल्या चकमकीत यावेळी पाच खेकडे ठार झाले तर इतर चार फरार झाले आहे. केवळ एकाच खेकड्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हे खेकडे पाकिस्थानी असल्याने धरण फुटीमध्ये विदेशी ताकदीचा हात असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.


धरण फोडल्यानंतर हे सर्व आतंकवादी खेकडे पाकिस्थानात पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. पण राजकीय पुढाऱ्यांचं सतर्कतेमुळे पोलिसांना हा गुन्हेगार मिळू शकला. त्याला प्रचंड पोलीस बंदोबस्तात लष्करी रणगाड्यातून ऑर्थर रोड तुरुंगात नेले जाणार आहे. त्याला अंडा सेलमध्ये ठेवले जाईल. राज्यात यापुढे धरण फोडणाऱ्या खेकड्यांना मोक्का लावण्याचा सरकारचा विचार आहे.

खेकड्यांमुळे टक्केवारी न घेता देता प्रामाणिकपणे उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरणारे ठेकेदार व कामाचे चोख ऑडिट करणारे सरकारी अधिकारी बदनाम होत आहेत. दरम्यान, प्राथमिक तपासात तिवरे धरण फोडणारा खेकडा पाकिस्तानातील नद्यांमध्ये आढळून येणारा असल्याचा समजते. हा खेकडा भारतात पाठवून येथली धरणे फोडण्याचा कट पाकिस्तानने आखल्याची माहिती हाती आल्याचेही सांगितले जात आहे.

( पुढाऱ्यांनी थोडीतरी लाज बाळगावी, इथे माणसे मेली, घरसंसार उध्वस्थ झाले, सांगूनही धरणाची दुरुस्थी झाली नाही. यात हात कोणाचा, हलगर्जीपणा कोणाचा, कोणी किती टक्केवारी खाल्ली, हे राहिले बाजूला, आरोपी कोण तर खेकडे. वा.. वा...वा...)

Review