साठवणूक टाक्यांच्या कामांना पुणे महानगर पालिकेची तात्पुरती स्थगिती
पुणे ( सह्याद्री बुलेटिन ) - साठवणूक टाक्यांच्या बांधणीसाठी खोदाई करताना काही दुर्घटना घडू नये यासाठी तीन ठिकाणची कामे खबरदारीचा उपाय म्हणून थांबविण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.
वडगांव बुद्रुक येथील दोन आणि कळस येथील एक, अशा तीन ठिकाणच्या कामांना सध्या स्थगिती देण्यात आली आहे. खोलवर करावी लागणारी खोदाई आणि काळी भुसभुशीत माती यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्यामुळे ही कामे थांबविण्यात आली असून पावसाळा संपल्यानंतर ही कामे सुरू करण्यात येणार आहेत.
वडगाव बुद्रुक येथे दोन पाण्याच्या साठवणूक टाक्या बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही टाक्यांची क्षमता प्रत्येकी पंचवीस लाख महापालिकेचा सावध पवित्रा लिटर असून कळस येथील एक टाकी दहा लाख लिटर क्षमतेची आहे. टाक्यांची बांधणी करण्यासाठी खोलवर खोदाई करावी लागणार आहे. मात्र भुसभुशीत जमिनीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तूर्तास ही कामे थांबविण्यात आली आहेत,
साठवणूक टाक्यांच्या उभारणीचे काम एल अॅण्ड टी या कंपनीला देण्यात आले असून सध्या विविध ठिकाणचे जवळपास ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.या अंतर्गत शहरात ८२ साठवणूक टाक्यांची बांधणी करण्यात येणार आहे. त्यापैकी ३० टाक्यांचे काम संथ गतीने सुरू असल्याची बाब उघडकीस आली होती. साठवणूक टाक्यांच्या उभारणीसाठी काही ठिकाणी भूसंपादनाचाही अडथळा आहे. महापालिकेने सप्टेंबर २०१६ मध्ये एल अॅण्ड टी या कंपनीला टाक्यांच्या बांधणीचे काम दिले होते. साठवणूक टाक्यांच्या बांधणीसाठी २४५ कोटी रुपये खर्च होणार असून दहा लाख लिटर क्षमतेपासून ९० लाख लिटर क्षमतेपर्यंतच्या साठवणूक टाक्या बांधण्यात येणार आहेत.