राष्ट्रवादी आता काट्याने काटा काढणार का ?
महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक ३६ म्हणजे अनेकांचा एकमेकांशी छत्तीसचा आकडा...
लोकसभेत झालेली जबरदस्त हार...
कार्यकर्ता मेळाव्यात झालेली जुगलबंदी...
पक्षात मी फक्त निष्ठावंत, अशी झालेली नेत्यांची स्थिती...
विधानसभेला भरमसाठ इच्छुकांची मांदियाळी...
थोडक्यात राष्ट्रवादीच्या वाटेत सध्या काटेच जास्त आहेत आणि विशेष म्हणजे हे राष्ट्रवादीचेच उत्पादन आहे...
या सर्व पाश्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाना काटे यांची निवड करण्यात आली. याची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली.
महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला, पहिल्या वर्षी योगेश बहल यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी देण्यात आली. दुसऱ्या वर्षी भोसरी विधानसभा मतदारसंघातील चिखली येथील दत्ता साने यांची वर्णी लावण्यात आली. ९ जुलैला दत्ता साने यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. आणि आता नाना काटे यांची निवड झाली आहे. पिंपळे-सौदागर-रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मधून नाना काटे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
नाना काटे यांच्यासमोर आता मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादीला विधानसभा जिंकायची आहे, पुन्हा राष्ट्रवादी हे बिरुद सार्थ करायचं आहे, हि जबाबदारी नानांवर आहे. तसेच विरोधी पक्षनेता म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या चुका शोधून त्या जनतेसमोर मांडणे पण आजपर्यंत सत्ताधाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचाच विरोधी पक्षाचा फ़ंडा अनेक उदाहरणांवरून जाणवतो.
नाना काटे एक प्रखर विरोधी पक्षनेते सिद्ध होतील?
वाटेतील काटे, नाना काटे दूर करतील?
या सर्वांची आगामी काळात उत्तरे मिळतील, पण या निमित्ताने काट्याने काटा काढण्याची राष्ट्रवादीला संधी आहे, हे मात्र नक्की...