मोरगाव येथून वाहन चोरी करणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे - वाहन चोरीचे गुन्हे करणारा सराईत आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी पथकाच्या जाळ्यात; 17 वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल

पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील वाहन चोरीचे गुन्हे करणारा सराईत आरोपी पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबी पथकाच्या जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे तीन जिल्ह्यातील 11 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 17 वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, पोलीस कर्मचारी निलेश कदम, मेहश गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांच्या पथकाला सराईत वाहनचोर बारामती, मोरगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मोरगाव ढवाणवस्ती येथून आरोपी अमोल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात वाहन चोरी केल्याचे सांगितले.

अमोल ऊर्फ लखन विलास देशमुख (वय 29, रा. यवत दोरगेवस्ती, ता. दौंड) असे अटक केलेल्या सराईत वाहन चोराचे नाव आहे.

या कारवाईमुळे शिक्रापूर पोलीस ठाण्यातील सहा, लोणीकंद पोलीस ठाण्यातील दोन, दौंड, लोणी काळभोर, वडगाव निंबाळकर, जेजुरी, चाकण, वानवडी, हडपसर, फलटण आणि अकलूज पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण 17 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी अमोल हा मागील दोन वर्षांपासून बेंगलोर कर्नाटक येथे ट्रक ड्रायवर म्हणून काम करत होता.

पोलीस त्याच्या मागावर असल्यामुळे त्याने यवत येथील आपला पत्ता बदलून दौंड, कुरकुंभ, पणदरे, बारामती येथे राहत होता. या गुन्ह्यांव्यतिरिक्त त्याच्यावर आणखी पाच गुन्हे दाखल होते. आरोपीला शिक्रापूर पोलिसांकडे देण्यात आले आहे.

Review