गुऱ्हाळांच्या धुरामुळे अरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
यवत - दौंड तालुक्यात हजारोंच्या संख्येने असलेल्या उसाच्या गुऱ्हाळांच्या धुरामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, संबधित गुऱ्हाळ चालकांकडून गुऱ्हाळ घरांच्या भट्टीसाठी उसाच्या चोयट्याऐवजी टायर, चपला, प्लॅस्टिक कागद यांसह आदींचा खुलेआम सर्रास वापर होत आहे. या ज्वलनशील पदार्थाच्या धुरामुळे प्रदूषणात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकाराकडे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे.
दौंड तालुक्यातून भीमा आणि मुळा-मुठा नदी, तसेच पुणे येथील खडकवासला धरणाचा नवीन कालवा आणि जुना बेबी कालवा बारमाही वाहत असतो, त्यामुळे येथील शेतकरी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करीत आसतात. तालुक्यात भीमा सहकारी साखर कारखाना आणि दौंड शुगर, अनुराज शुगर आणि श्रीनाथ मस्कोबा साखर कारखाना असे चार साखर कारखाने आहेत. या गुऱ्हाळांवर परप्रांतीय कामगार काम करीत असतात. प्रत्येक गुऱ्हाळांवर अरोग्यास अपायकारक आणि घातक असलेल्या टायर, चपला, प्लॅस्टिक कागद यांचा भट्टीसाठी वापर होत आहे. काही गुऱ्हाळे तर शाळेलगत व लोकवस्तीपासून नजीक असून, येथे निर्माण होणाऱ्या धुरापासून शालेय विद्यार्थी व नागरिक यांच्या अरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या गुऱ्हाळात लवकर गूळ निर्मिती होण्यासाठी आणि या गुळास विशिष्ट असा रंग येण्यासाठी अरोग्यास अपायकारक असलेल्या केमिकल आणि पावडरचा वापर सर्रास केला जात आहे. खुलेआम नागरिकांच्या अरोग्याशी चाललेल्या खेळाकडे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासन मंडळ यांचे या घटनेकडे जाणीवपूर्वक होताना दिसत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा गुऱ्हाळ चालकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळांनी, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक कारवाई करण्याची गरज आहे.