स्वत:ची छाप पाडण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना कात्रज येथे अटक
पुणे - समाजात स्वत:ची छाप पाडण्यासाठी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज भागात पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.
मनोहर रघुनाथ मांगडे (वय ४२, रा. मांगडेवाडी, कात्रज) आणि मारुती काटय़ाप्पा घोरपडे (वय ४२, सध्या जांभूळवाडी, आंबेगाव, मूळ रा. लासुर्णे, इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मांगडे यांच्याकडे पिस्तूल असून तो इतरांवर छाप पाडण्यासाठी बेकायदा बाळगलेल्या पिस्तुलाचा वापर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला कात्रज भागातून ताब्यात घेतले.चौकशीत त्याने पिस्तूल पंचवीस हजार रुपयांना घोरपडे यांच्याकडून खरेदी केल्याची माहिती मिळाली. घोरपडेला ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली. घोरपडेने चार वर्षांपूर्वी एका परप्रांतीय तरुणाकडून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती दिली.