ओएलएक्सवरील जाहिरातीद्वारे फसवणूक करणारा कांगो नागरिक गजाआड
ओएलएक्सवर कार विकत असल्याची बनावट जाहिरात टाकून, ती विकत घेण्यासाठी संपर्क करणाऱ्या नागरिकांकडून कार देण्यापूर्वीच पैसे घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या एका कांगो नागरिकाला हिंजवडी पोलिसांनी बेंगलोर मधून अटक केली आहे.
न्यानगुईले कीशी पटीएन्ट (स.रा. सेक्टर १, बी.क्रॉस, बेराठी बंडे, बैंगलोर. मु.रा. कांगो) असे अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकाचे नाव आहे.
पोलिसांनी त्याच्याकडून ७ मोबाईल, १ पेनड्राईव्ह, १ हार्डडिक्स व रोख ९५०० रुपये जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी न्यानगुईले याने ओएलएक्स या खरेदी विक्री वेबसाईडवर त्याची कार विकत असल्याची जाहिरात टाकली होती. ही जाहिरात पाहून हिंजवडी हद्दीतील एका नागरिकाने न्यानगुईले याला संपर्क साधला मात्र न्यानगुईले याने पहिले पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केल्यावरच गाडीची डिलेवरी मिळेल असे फिर्यादीला सांगितले. यावर फिर्यादीने न्यानगुईले याच्या बँक खात्यात २ लाख ७७ हजार ४०० रुपये टाकले. मात्र न्यानगुईले याने फिर्यादी यांना कारची डिलेवरी न देता त्यांची आर्थीक फसवणूक केली. यामुळे फिर्यादीने हिंजवडी पोलिसात तक्रार दाखल केली. हिंजवडी पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला असता. त्यांना आरोपी बैंगलोर येथे असल्याचे समजले. यावर पोलिसांनी बेंगलोर येथे जावून न्यानगुईले याला ७ मोबाईल, १ पेनड्राईव्ह, १ हार्डडिक्स व रोख ९५०० रुपयांसहीत अटक केली.
हि कारवाई पोलिस उपआयुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश मोरे, पोलिस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उप निरीक्षक रुपाली पवार, पोलिस कर्मचारी किरण अब्दागिरे, नवनाथ जाधव, आदेश चलवादी, शितल वानखडे, माधुरी डोके यांच्या पथकाने केली.