पंतप्रधानांना मिठी मारण्याचा प्रकार बालिशपणाचा
लोकसभेत अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी पंतप्रधानांना मिठी मारण्याचा प्रकार बालिशपणाचा होता, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. या चर्चेवेळी राहुल यांनी केलेले भाषण विनोदी होते, त्यात ठोस मुद्दाच नव्हता, असेही पक्षाने म्हटले आहे.
राहुल यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना भाजपचे राष्ट्री प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, 'राहुल यांच्या भाषणात मुद्दे कमी होते, ते भाषण विनोदीच जास्त होते. जनतेचे लक्ष गुरुवारपासून राहुल यांच्याकडे लागले होते. ते भाषणात काय म्हणतात ते लोकांना ऐकायचे होते. मी बोललो तर भूकंप होईल, असे ते गेल्या वेळी म्हणाले होते. त्यामुळे आम्ही १५ मिनिटे वाट पाहिली, अर्धा तास वाट पाहिली, तासभर वाट पाहिली, पण राहुल यांच्या भाषणात मुद्दाच नसल्यामुळे काहीच घडले नाही.'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमुळे आपल्याला हिंदू आणि हिदुस्थानी म्हणजे काय ते समजले, या विधानाविषयीही पात्रा यांनी या विधानाबाबतही नाराजी व्यक्त केली.