निष्काम कर्मयोगी : राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज

निष्काम कर्मयोगी : राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज
गुरू पौर्णिमे निमित्त राष्ट्रसंत भय्यु महाराजांना आदरांजली...
 
            आध्यात्मिक गुरू राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांचे अकाली जाणे  मनाला सून्न करणारे आहे. लोकांना सदैव मदतीचा हात देणारे ,लोकांच्या समस्यांचे निराकरण करणारे, कर्मयोगी म्हणून ज्यांचे वर्णन करता येईल असा माणूस आपण गमावला आहे. 
          भैय्यूजी महाराज यांचे मुळ नाव उदयसिंह देशमुख. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील शुजालपुर येथे झाला होता. अध्यात्माची लहानपणापासूनच त्यांना आवड होती. घोडस्वारी आणि तलवारबाजीतही ते पारंगत होते. 
ट
सुरवातीच्या काळात मुंबईत एका खाजगी कंपनीत काम केल्यानंतर त्यांनी काही दिवस मॉडेलिंगचे काम केले. परंतु, अध्यात्माची ओढ असल्याने त्यांचे मन दुसऱ्या क्षेत्रात रमत नव्हते. पुढे त्यांनी धार्मिक ट्रस्ट चालवण्याचा निर्णय घेतला. 
         भय्यूजी महाराजांनी श्री सद्गुरू दत्त धर्मिक ,परमार्थिक ट्रस्ट, सूर्योदय परिवारची स्थापन केली सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून महाराजांनी कृषी क्षेत्र , राजकीय, सामाजिक, धार्मिक ,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम केल. त्याचप्रमाणे मानव जातीच्या पल्याड जावून प्राणी मात्राचं सुद्धा कल्याण झाल पाहिजे व त्याचबरोबर वृक्ष संवर्धन झाल पाहिजे यासाठी त्यांनी विविध उपाययोजना केल्या व उपक्रम राबविले त्याचप्रमाणे दुष्काळ मुक्तीसह आत्महत्याग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी मोठे कार्य उभे केले. 
           असंख्य अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतले. खामगाव तालुक्यात त्यांनी ७०० मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची सोय केली. पारध्यांच्या मुलांनी परंपरागत व्यवसायात न जाता शिक्षण घ्यावे व मुख्य प्रवाहात यावे यासाठी त्यांनी मोठे कार्य सूर्योदय परिवाराच्या  माध्यमातून उभे केले. त्यांनी आश्रमशाळा चालवल्या, बालसुधारगृहे चालवली, एड्सग्रस्त मुलांचे पालकत्व स्वीकारले. तसेच कोपर्डीला उपलब्ध करून दिलेली मुलींसाठी मोफत बससेवा, सर्व धर्मिय सामुदायिक विवाह, वंचितांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे,छ.शिवाजी महाराज ,छ.संभाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी मदत करणे.अशाप्रकारे त्यांच्या सामाजिक कार्याचा व्याप मोठा होता.
           आध्यात्मिक, सामाजिक कार्यातून समाज सुधारणेचे कार्य त्यांनी सूर्योदय परिवाराच्या माध्यमातून केले.     
नुकतेच मध्य प्रदेश सरकारने देऊ केलेलं राज्यमंत्रीपद त्यांनी नाकारले होते नाकारण्यामागील कारण म्हणजे महाराज नेहमी म्हणत असत कि धर्मसत्तेने आपल काम कराव व राज्य सत्तेने आपल काम कराव अस त्याचं मत होत. भय्यूजी महाराज हे निष्काम कर्मयोगी होते .
          भय्यूजी महाराज हे कधीच भगवी वस्त्र परिधान करून
आणि मोठी दाढी-मिशा ठेवून किंवा जटा वाढवून वावरले नाहीत. ते त्यांना मान्य नव्हते. माणसाने आनंदात राहावे, दुसऱ्यांना आनंद वाटावा असे जगावे व जगू द्यावे ही त्यांची धारणा होती. 
त्यांनी ताण व तणावातून जीवन यात्रा संपवली असे म्हणून त्यांच्या मृत्यूच्या कारणांची जी चर्चा चालू आहे ती कुठेही त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांशी जुळणारी निश्चितच नाही.
          एक धीरोदात्त व सामाजिक जाणीव असलेले व्यक्तीमत्व अशा प्रकारचे पाऊल उचलू शकते यावर विश्वास ठेवणे कठीण जाते आहे.
भैय्युजी महाराजांसारख्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाने आपल्या आयुष्याचा शेवट अशा प्रकारे करावा.हे अनाकलनीय तसेच न पचणारे आहे. भैय्यूजी महारांजाच्या मृत्यूची सखोल चौकशी कदाचित त्यांच्या मृत्यूच्या कारणांवर काही प्रकाश टाकू शकेल अशी आशा करुया. 
          समाजिक दायीत्वाचे जान व भान असेल्या या राष्ट्रसंतास व त्यांच्या  समर्पित जीवन कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम व मनपूर्वक भावपूर्ण आदरांजली.... 

[सदर लेख साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण  ( मो. 9011890279 ) यांचा असून ते पत्रकार, शिवचरित्र अभ्यासक ,लेखक ,व्याख्याते आहेत.]

Review