महापौरपदावर माळी समाजाचाच नगरसेवक हवा - शहरातील माळी समाजाची मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदावर माळी समाजाच्याच नगरसेवकाचीच निवड करावी, अशी मागणी शहरातील माळी समाजाच्या वतीने शनिवारी (दि. २८) आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
“पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौरपद ओबीसी समाजासाठी राखीव आहे. या पदावर अगोदरच मूळ ओबीसींना निवडले जावे, अशी मागणी होती. परंतु, भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी कुणबी जात दाखल्यावर निवडून आलेल्या नितीन काळजे यांची निवड केली. त्यामुळे समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. नितीन काळजे यांनी चार दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता माळी समाजाचाच महापौर व्हावा यासाठी संपूर्ण शहरातील माळी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संघटना तयारीला लागले आहेत.
लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत शहरात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या माळी समाजाने भाजपच्या बाजूने मतदान केले आहे. शहरामध्ये तीनही विधानसभा मतदारसंघात एक लाख ८० हजाराहून जास्त माळी समाजाची लोकसंख्या आहे. शहरात भाजपची सत्ता येण्यामध्ये माळी समाजाचे महत्वपूर्ण योगदान आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून महापौरपदावर अनिता फरांदे, अपर्णा डोके आणि डॉ. वैशाली घोडेकर या माळी समाजातील महिला नगरसेविकांना काम करण्याची संधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. परंतु माळी समाजाच्या पुरुष नगरसेवकांना आतापर्यंत महापौरपद मिळालेले नाही. आता महापौरपद इतर मागासवर्गासाठी राखीव असल्यामुळे माळी समाजातील पुरूष नगरसेवकांना महापौर होण्याची संधी प्राप्त झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीष बापट, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे समाजाच्या वतीने निवेदन देऊन पिंपरी चिंचवड शहराचा पुढील महापौर माळी समाजाचाच असावा, अशी मागणी होत आहे.