तुकोबा गोसावी आणि मोरया गोसावींची बुधवारी चिंचवड गावात भेट...

 
( सह्याद्री बुलेटीन ) पंढरपूर ते देहू परतीच्या प्रवासावर असलेली जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी बु्‌धवारी 8 ऑगस्ट रोजी पिंपरी गावातून चिंचवड गावमार्गे देहूकडे परतीचा प्रवास करणार आहे. यावेळी पिंपरी चिंचवड लिंकरोड वरील इगल हॉटेल पासून महासाधू मोरया गोसावी यांची पालखी चिंचवड गावपर्यंत या सोहळ्यात सहभागी होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून चिंचवडगाव ग्रामस्थांची हि मागणी होती. या एकत्रित पालखीचे दर्शन भाविकांना बुधवारी सकाळी 7 ते 9:30 या वेळेत मोरया हॉस्पिटल समोरील पटांगणावर घेता येईल. चहापाणी व प्रसाद वाटपानंतर पालखी दळवीनगर मार्गे आकुर्डी खंडोबामाळकडे मार्गस्थ होईल. अशी माहिती श्री काळभैरवनाथ उत्सव समिती तसेच चिंचवडगाव देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 
 
      या दोन महानसंतांची अख्यायिका म्हणजे महासाधू मोरया गोसावी यांचे सुपूत्र चिंतामणी महाराज व जगद्‌गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांनी सहभोजन घेतल्याचा दाखला गाथेमध्ये उपलब्ध आहे. त्यावेळी संत तुकाराम महाराज यांनी चिंतामणी महाराज यांचा साक्षात देवाची भेट झाली असा उल्लेख केला. तेव्हापासून मोरया गोसावी यांच्या वारसांना देव ही उपाधी पुढे लावण्यात आली म्हणजे थोडक्यात देव हे आडनाव संत तुकाराम महाराज यांनी दिले असल्याचा भाव आहे. 
 
        याचाच पुढचा भाग म्हणून यंदा संत तुकाराम महाराज व महासाधु मोरया गोसावी यांच्या एकत्रित पालखीचा दर्शन सोहळा व्हावा. ही संकल्पना आली, वैशिष्ट म्हणजे यंदा जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमनाचे हे 333 वे वर्ष आहे तसेच बुधवारी 8 ऑगस्ट रोजी एकादशी आहे हा चिंचवड ग्रामस्थांसाठी एक कपिलाषष्ठीचा योगच म्हणावा लागेल, या दोन महान संतांची पुन्हा एकत्र भेटीच्या सोहळ्याचा भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंचवड ग्रामस्थांनी केले आहे. 
-----------------------

Review