सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण...
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्टेडियममध्ये पाणी फाउंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, अमृता देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.
आमीर खानच्या पाणी फाउंडेशनचे कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या आतापर्यंतच्या सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले, एकमेकांमधील गट तट जोपर्यंत दूर होणार नाहीत तोपर्यंत जलसंधारणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही. पाणीप्रश्नावर जलसंधारण हे उत्तर आहे. मात्र तो प्रश्न केवळ सरकारच्या विश्वासावर सुटणार नाही. यासाठी लोकचळवळ उभी राहण्याची गरज आहे. जनतेकडून वेगवेगळ्या योजना तयार झाल्यास त्यांना हातभार लावण्याचे काम सरकार करेल. पाणी फाउंडेशन यशस्वी होण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यात गावातील नागरिकांचा स्वयंस्फुर्त सहभाग. सामान्यांकडून असामान्य प्रकारचे काम करुन घेण्याचे श्रेय आमीर यांना द्यायला हवे. यापुढील वॉटरकपच्या स्पर्धांमध्ये देखील सर्वपक्षीय सहभाग असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विजेत्या तीनही गावांना शासनाच्यावतीने प्रोत्साहनपर अनुक्रमे २५ लाख, १५ लाख व १० लाखांचे बक्षीस देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्यमंत्री विजय शिवतारे, अशोक चव्हाण, राज ठाकरे, किरण राव, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार यांची भाषणे झाली.