काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

माजी खासदार,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांचे आज (बुधवारी) सकाळी निधन झाले. वयाच्या 63व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.चाणक्यपुरीतील प्रिमास रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.युवक काँग्रेस अध्यक्ष, मुंबई काँग्रेस अध्यक्ष, केंद्रीय मंत्री अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या गुरूदास कामत यांनी पार पाडल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. गुरूदास कामत यांचा कर्नाटकातील अंकोला येथे 5 ऑक्टोबर 1954 रोजी जन्म झाला होता. त्यांचे सुरूवातीचे आंयुष्य हे कुर्ल्यातच गेले. तेथेच ते लहानाचे मोठे झाले. कामत यांच्या कुटुंबात कोणीही राजकीय क्षेत्रात नव्हते.विद्यार्थी दशेत असतानाच कामत अतिशय सक्रीय होते. विद्यार्थी चळवळीतूनच 1972मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपद देखील भूषवले. त्यानंतर 1984ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले.गुरूदास कामत हे 2009 ते 2011मध्ये यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते. त्यांनी केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भारही सांभाळला होता.

Review