राहुल गांधी परदेशात जाऊन देशाच्या समस्यावर बोलतात... हि कसली राजनीती ?
( सह्याद्री बुलेटिन ) २३ ऑगस्ट - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जर्मनीतील हॅम्बर्ग येथे भाषणात बेरोजगारीच्या मुद्दय़ाचा संदर्भ आयसिस या दहशतवादी संघटनेशी जोडला. विकासाच्या प्रक्रियेपासून मोठय़ा प्रमाणात लोकांना दूर ठेवले जाते, त्यातूनच मग फुटीरतावादी गट तयार होतात असा जागतिक संदर्भ देत त्यांनी देशात आदिवासी, दलित, अल्पसंख्याकांना दूर ठेवले जाते, त्याचे परिणाम भीषण होतील, असे नमूद केले. तर राहुल यांनी जे वक्तव्य केले ते मुद्दे गंभीर असल्याने त्यावर स्पष्टीकरण दिले जावे, तसेच देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे.
इराकमध्ये जी स्थिती अमेरिकेने निर्माण केली त्यामुळेच आयसिसचा उदय झाला. तशाच प्रकारे भारतामध्ये बेरोजगारी वाढली. अल्पसंख्याकांना, मागासवर्गाला रोजगार मिळाला नाही, सरकार ते देऊ शकले नाही, त्यामुळे आयसिसप्रमाणे दुसरे कोणीतरी उभे राहिले, असा इशारा राहुल यांनी दिला.
हॅम्बर्ग येथे राहुल गांधी यांनी केलेले भाषण दिशाभूल करणारे होते, अशी टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे. राहुल यांनी दहशतवादाचे समर्थन केले, आयसिसबाबत जे स्पष्टीकरण दिले ते भयानक आणि चिंताजनक आहे, भारतातील राजकीय स्थितीमुळे बेरोजगारी वाढल्याचे उदाहरण गांधी यांनी दिले ते अत्यंत चुकीचे आणि देशाचा अपमान करणारे आहे, असे पात्रा यांनी म्हटले आहे.
भारत बाहेर तरी देशाची प्रतिमा कलंकित होणार नाही आणि जगात आदर निर्माण होईल अशी वक्तव्य राजकीय नेत्यांकडून, किमान जबाबदार नेत्यांकडून अपेक्षित आहेत.