सत्तेच्या स्वार्थासाठी मृत्यूनंतरही अटलजींच्या नावाचा वापर करणाऱ्या वृत्तीचा करुणा शुक्ला यांनी घेतला समाचार...
( सह्याद्री बुलेटिन ) २३ ऑगस्ट - नरेंद्र मोदी आणि भाजपा 2019 मधील लोकसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी अटलबिहारी वाजपेयींच्या निधनाचं राजकारण करत आहेत असा आरोप त्यांची भाची करुणा शुक्ला त्यांनी केला आहे.
वाजपेयी जिवंत असताना त्यांच्यामुळे भाजपाला खूप फायदा झाला आणि आता मृत्यूनंतरही राजकीय फायद्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे.‘अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूचं राजकारण करताना भाजपाला थोडीही शरम वाटत नाही’,पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी अंत्ययात्रेत पाच किमी चालण्याऐवजी त्यांच्या आदर्शावर चालले तर देशाचं भलं होईल असा टोलाही त्यांनी लगावला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासहित भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री पाच किमी पायी चालले होते. ज्या ट्रकमधून अटलबिहारी वाजपेयी यांचं पार्थिव नेलं जात होतं, त्याच ट्रकसोबत मोदी, अमित शाह चालत होते. करुणा शुक्ला यांनी यावरुनच ही टीका केली आहे.
‘वाजपेयींच्या नावाचा वापर मतांसाठी नाही झाला पाहिजे. चार राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, यामुळेच नरेंद्र मोदी, अमित शाह आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह वाजपेयींच्या नावाचा वापर करत आहेत’. ‘असं नामकरण करण्यापेक्षा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर ते चालले असते तर जास्त बरं झालं असतं. नरेंद्र मोदींनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींची भेट घेतल्यानंतर लाल किल्ल्यावरुन त्यांचं नाव घेतलं होतं. हे सर्व निवडणूक लक्षात ठेवूनच केलं जात आहे’, असंही त्या म्हणाल्या आहेत.
‘पक्षात लालकृष्ण आडवाणींचा होणारा अपमान पाहून मी दु:खी आहे. मला याचंही दु:ख आहे की गेल्या साडे चार वर्षांपासून देशाची सत्ता नरेंद्र मोदी आणि 15 वर्षांपासून छत्तीसगडची सत्ता रमन सिंह यांच्या हाती आहे. इतक्या वर्षात त्यांना कधीही वाजपेयींची आठवण झाली नाही. त्यांना भारतरत्न मिळाला होता. आधीही त्यांच्या नावे अनेक योजना होत्या. हे सर्व राजकीय खेळ आहेत. यामुळे मी दु:खी आहे’.
आता तरी हे राजकीय नेते दिवंगत लोकांचा फायदा घेणे आणि जिवंत लोकांचा सन्मान करतील अशी खोटी अपेक्षा तरी बाळगायला हरकत नाही.