भारत देशाची वाटचाल आता ज्ञान प्रधान युगाकडे - डॉ.अनिल काकोडकर

कोल्हार (सह्याद्री बुलेटीन ) : शेती प्रधान युगाकडुन सुरु झालेली आपल्‍या भारत देशाची वाटचाल आता ज्ञान प्रधान युगाकडे जात असुन यामध्‍ये उपलब्‍ध होणा-या संधी या खुप मोठ्या आहेत. नवीन ग्राम रचनेसाठी या ज्ञान प्रधान युगाचा सेतु निर्माण करण्‍यासाठी प्रवरा परिसराने आणखी एक पाऊल पुढे टाकावे अशी अपेक्षा भारतीय अणुउर्जा आयोगाचे माजी अध्‍यक्ष पद्मविभुषण डॉ.अनिल काकोडकर यांनी व्‍यक्‍त केली.
           सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या ११८ व्‍या जयंती दिनाचे औचित्‍य साधुन आयोजित करण्‍यात आलेल्‍या राज्‍यस्‍तरीय साहित्‍य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्‍कार वितरण आणि शेतकरी दिनाच्‍या समारंभात डॉ.अनिल काकोडकर यांनी ज्ञानावर आधारित नव्‍या ग्रामरचनेची संकल्‍पना विषद करुन, प्रवरा परिवाराने यापुर्वी डॉ.ए.पी.जे अब्‍दुल कलाम यांच्‍या मार्गदर्शनाखाली पुरा मॉडेल तयार केले होते. त्‍या आधारेच ज्ञानावर आधारित ग्रामरचनेचे नवीन मॉडेल तयार करण्‍याची महत्‍वपुर्ण सुचना केली.
       संत साहित्‍याचे गाडे अभ्‍यासक डॉ.सदानंद मोरे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झालेल्‍या या शानदार सोहळ्यास ९१ व्‍या साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष डॉ.लक्ष्‍मीकांत देशमुख,विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील, आ.भाऊसाहेब कांबळे, माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, जि.पच्‍या अध्‍यक्षा ना.सौ.शालिनीताई विखे पाटील, माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे, प्रवरा मेडीकल ट्रस्‍टचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, श्रीरामपूरच्‍या नगराध्‍यक्षा अनुराधा आदिक, कोपरगावचे नगराध्‍यक्ष विजय वहाडणे, पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष डॉ.रावसाहेब कसबे आदि याप्रसंगी व्‍यासपीठावर उपस्थित होते.
       साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष डॉ.लक्ष्‍मीकांत देशमुख यांच्‍यासह मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावर्षीचे साहित्‍य पुरस्‍कार वितरीत करण्‍यात आले. यावर्षीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्‍य सेवा जीवन गौरव पुरस्‍कार जेष्‍ठ साहित्‍यीक श्री.रा.र बोराडे, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील उत्‍कृष्‍ठ साहित्‍य पुरस्‍कार साहित्‍यीक बाबाराव मुसळे आणि विशेष साहित्‍य गौरव पुरस्‍कार महेश लोंढे, अहमदनगर जिल्‍हा उत्‍कृष्‍ठ साहित्‍य पुरस्‍कार हेरंब कुलकर्णी आणि डॉ.विखे पाटील पत्रकार लेखक पुरस्‍कार डॉ.बाळ ज.बोठे यांना देवून सन्‍मानित करण्‍यात आले. यावर्षीचा कलागौरव पुरस्‍कार अभिनेते मिलिंद शिंदे आणि समाजप्रबोधन पुरस्‍कार ह.भ.प शामसुंदर महाराज सोन्‍नर यांना देवून गौरविण्‍यात आले. या निमित्‍ताने मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पुस्‍तकांचे प्रकाशन करण्‍यात आले.
 विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी साहित्‍य पुरस्‍कारां मागची भुमिका विषद करुन उपस्थित साहित्‍यीकांचे स्‍वागत केले. प्रवरा परिवाराच्‍या वतीने सर्व मान्‍यवरांचा सत्‍कार करण्‍यात आला. कारखान्‍याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विविध संस्‍थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साहित्‍यप्रेमी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

Review