ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यास परवानगी...

सोमवारी केंद्रीय नागरी हवाई उड्डयाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भातील धोरण जाहीर केले आहे. ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या वस्तूंची डिलिव्हरी ड्रोनद्वारे होऊ शकते. येत्या १ डिसेंबरपासून देशभरात ड्रोनच्या उड्डाणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. पण त्याचसोबत काही अटी सुद्धा घालण्यात आल्या आहेत. ड्रोनचा सुरळीत वापर सुरु राहिल्यास त्या अटींमधून दिलासाही मिळू शकतो असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. वजनानुसार ड्रोनची पाच विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वात छोटो नॅनो ड्रोन ज्याचे वजन २५० ग्रॅम असेल. सर्वात वजनदार १५० किलोचे ड्रोन असेल.पहिले दोन जे विभाग आहेत नॅनो आणि मायक्रो त्यात २५० ग्रॅम ते २ किलो वजनाचे ड्रोन मोडतात. लहान मुल खेळणी म्हणून अशा ड्रोनचा वापर करतात. २ किलो पेक्षा जास्त वजनाच्या ड्रोनसाठी परवाना बंधनकारक असेल. उर्वरित तीन विभागांमध्ये दोन किलोपेक्षा जास्त वजनाची ड्रोन ज्यांना उडवायची असतील त्यांना नोंदणी करावी लागेल. त्यांना यूआयएन नंबर दिला जाईल. ज्यांना कोणाला अशा ड्रोनचे परवाने हवे असतील त्यांची वयोमर्यादा १८ पेक्षा जास्त असली पाहिजे तसेच दहावीपर्यंतच्य शिक्षणाबरोबर त्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीमच्या (आरपीएएस) वापरासाठी मानवरहीत विमान संचलन परवाना आवश्यक आहे. फक्त दिवसा प्रकाशात ४०० फूट उंचीपर्यंत तुम्ही ड्रोन उडवू शकता असे धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. विमानतळ, आंतरराष्ट्रीय सीमा, दिल्लीतला विजय चौक, राज्यातील सचिवालय, लष्करी तळ या ठिकाणी ड्रोनला नो फ्लाय झोन असेल.

Review