आमची लढाई मोदींशी नाही संघाशी आहे - मल्लिकार्जुन खर्गे

आमची लढाई कुणा व्यक्तीशी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असलो तरी काँग्रेसची लढाई ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचाराधारेशी आहे, अशी भूमिका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी, खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडली. बुधवारी ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
खर्गे म्हणाले, ‘जे भाजप सरकारांच्या कारभारावर टीका करतात, त्यांना धमकावण्यात येत आहे. देशात बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. मानवी हक्काचे सर्रास हनन होत असून निधर्मी विचार मांडणाऱ्या विचारवंतांचे अटकसत्र आरंभले असून देशात अघोषित आणीबाणी लागू केलेली आहे.
दहशतवाद, काळे धन आणि भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाने मोदी यांनी नोटबंदी लागू केली. पण, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या (२०१७-१८) नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात हजार, पाचशेच्या ९९.३० टक्के नोटा सरकारकडे जमा झाल्याचे म्हटले आहे. या अहवालाने मोदी सरकार उघडे पडल्याचा दावा खर्गे यांनी केला. मोदी हे केवळ जाहीर सभांमधून सरकारी कामाचे आकडे सांगतात. पण, मोदी यांना जरा संसदेतही भाई और बहनोंसाठी सांगावे, अशी अपेक्षा खर्गे यांनी व्यक्त केली.

Review