भक्तीसंगम पुस्तकाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते प्रकाशन...

शिर्डी (सह्याद्री बुलेटीन) -  श्री.साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा १७१ वा अखंड हरिनाम सप्ताह, शिर्डी येथे संपन्न होत आहे. या सप्ताहाचे व समाधी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून  नारायणगिरी महाराज फाउंडेशन,  नाशिक यांच्या सहकार्याने पत्रकार मुकुंद पिंगळे यांनी  संपादित केलेल्या ‘भक्तीसंगम’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सराला बेटाचे उत्तराधिकारी महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी विष्णू भागवत व येवला पंचायत समिती उपसभापती रुपचंद भागवत यांचे विशेष सहकार्य लाभले.
   समाजातील आजच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी या संतांचा इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची गरज आहे. त्याचे विचार हे काळ सापेक्ष असून हा विचारांचा मोठा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत येणे कालप्राप्त होते. संतांच्या याच कार्याचे अन त्यांच्या विचारधारेची आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने सहकार्याने पत्रकार मुकुंद पिंगळे यांनी  साकारला आहे. या पुस्तकामध्ये 'सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज ते महंत रामगिरीजी महाराज' असा या संतपरंपरेचा प्रवास, सराला बेट स्थानाचे महत्व, सद्गुरु  साईबाबा व गंगागिरीजी महाराज अनुभवदर्शन, साई सतचरित्रातील अनुभव, सप्ताह परंपरा व जागतिक विक्रम, सराला बेटाचे उपक्रम आदी विषय मांडण्यात आले आहेत.
       यावेळी बोलताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले कि, संतांचे विचार हे  भाविपिढीसाठी उपयुक्त आहेत.मात्र काळाच्या ओघात त्यांचे विचार संपविले जात आहे. समाजाच्या उद्धारासाठी संतांचे विचार आचरणात आणण्याची गरज आहे. जीवनात संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे, संस्कार घडले तरच संस्कृती टिकेल आणि त्यातूनच समाज व देश उभा राहणार आहे.कारण याच अर्थाने निकोप समाजाच्या निर्मितीसाठी योगीराज गंगागिरी महाराज व सद्गुरू साईबाबा  यांचे अवतारकार्य महत्वाचे ठरले. या दोन्ही महान अवतारपुरुषांनी आध्यात्मिक पातळीवर समता, बंधुता, भूतदया, औदार्य अशा तत्त्वांचा पुरस्कार केला. त्याचा प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनावरही प्रभाव पडला. त्यांच्या माध्यमातून लोक आध्यात्मिक मार्गाद्वारे जागृत झाले. हे सर्व अनुभव भक्तीसंगम पुस्तकात मांडले असून या पुस्तकातून संतांचे जीवनदर्शन घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 
     पुढे बोलताना ते म्हणाले कि, योगीराज गंगागिरीजी महाराज व सदगुरु  साईबाबा एकाच काळातील संत होते. त्यांचे समाजप्रबोधनाचे मोठे योगदान राहिले. शिर्डीतल्या साई नावाच्या बालकाला पाहून हा मोठा संत होईल व या शिर्डीची कीर्ती जगभर पोहचेल अशी भविष्यवाणी योगीराज गंगागिरीजी महाराज यांनी केली होती. त्यामुळे या संतांचे जीवनदर्शन,  विचारदर्शन समाजासमोर येणे आजच्या समाजासाठी खरी गरज आहे. त्याचे औचित्यही तसेच आहे, यावर्षी शिर्डीत होणारा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे साईबाबा व गंगागिरी महाराज या दोन संतांच्या भेटीला उजाळा देण्याचा सोहळा असणार आहे. या दोन संतांच्या कार्याचा, त्यांच्या अवतारकार्याचा हा मिलाप आहे. अर्थातच 'भक्ती संगम'आहे असे ते यावेळी म्हणाले. 
 
यावेळी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, युवा नेते डॉ.सुजय विखे पाटील, भक्तीसंगम पुस्तकाचे संपादक मुकुंद पिंगळे, येवला पंचायत समिती उपसभापती रुपचंद भागवत,  श्रीरामपूर पंचायत समिती सदस्या डॉ. वंदना मुरकुटे, शिर्डीचे उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर,प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, साई निर्माणचे अध्यक्ष विजय कोते,  डॉ.एकनाथ गोंदकर,  मकरंद सोनवणे, दिपक जगताप, शामकर्ण होन, बाळासाहेब कापसे,ज्ञानेश्वर भागवत, दत्ता शिनगर, मारुती खैरनार यांसह हजारो भाविक यावेळी उपस्थित होते.   

Review