अण्णा हजारेंना बदनाम करता येत नाही म्हणून त्यांचे आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र...

 
अ.नगर (सह्याद्री बुलेटीन ) - गांधी जयंतीपासून अण्णा हजारे हे राळेगण येथे आंदोलनाला सुरूवात करणार आहेत. त्यांचे मागील आंदोलन दडपण्याचा सरकारने यथाशक्ति प्रयत्न केला, पण यश आले नाही. आणि  आता २ आँक्टोंबर पासून आर-पार ची लढाई सुरू होत आहे. यामुळे हे ही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू असून, खुद्द अण्णा हजारेंची बदनामी शक्य नसल्याने त्यांच्या आंदोलनाची बदनामी करणे, सोशल मिडियावर अफवा पसरवणे आणि आरक्षणासारख्या मुद्याला जोडून, मुळ विषयावरून लक्ष दुर करणे, असे उद्योग केले जात आहेत. यासाठी स्वतंत्र पत्रकाद्वारे अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 
अण्णांच्या द्वारे प्रसारित पत्रकात अण्णा म्हणतात,
"गेले दोन दिवस मी 6 सप्टेंबर पासून आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरू करीत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पसरत आहेत. तसेच यासंबंधी माध्यमांकडूनही विचारणा होत आहे. त्यासंबंधी अधिकृत खुलासा करण्यासाठी ही प्रेसनोट प्रसिद्धीस देण्यात येत आहे."
 
            "आरक्षणाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या समर्थनार्थ मी कधीही कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तसेच येत्या 6 सप्टेंबर रोजी मी आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करणार असल्याच्या बातम्या पूर्णतः खोट्या असून जाणीवपूर्वक पसरवण्यात येत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानुसार समता निर्माण व्हावी या हेतुने आरक्षणाची तरतूद केली. समतेसाठी आरक्षण असणे आवश्यकही आहे. पण अलिकडील काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेगवेगळ्या प्रांतात जी स्थिती निर्माण झाली आहे ती पाहता या मुद्द्यावरून जातीय सलोखा धोक्यात येईल की काय अशी शक्यता वाटते. अशा प्रकारे एखाद्या मुद्यावरून सामाजिक अशांतता निर्माण होऊन देशाचे तुकडे होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अशा संवेदनशील मुद्यावर सामाजिक भान राखून व्यापक चर्चा व्हावी व समोपचाराने असे प्रश्न सोडविण्यात यावेत असे वाटते."
 
            "सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढता भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकपाल लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी इत्यादी महत्त्वाच्या मुद्यांवर केंद्र सरकारशी सातत्याने पत्रव्यवहार सुरू असून सरकारने 23 मार्च 2018 पासून दिल्लीतील रामलिला मैदानावर केलेल्या आंदोलन प्रसंगी दिलेल्या लेखी आश्वासनाचे पालन न केल्यामुळे मी येत्या 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून राळेगणसिद्धी येथे आंदोलन सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत कोणतेही आंदोलन करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण होईल अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवण्यात येऊ नयेत अशी सर्वांना विनंती अण्णा हजारे यांनी केली आहे.

Review