आयुक्त मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव माघे घ्या - मुख्यमंत्र्यांचे आदेश...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव भाजपा नगरसेवकांनी अखेर मागे घेतला आहे. तशी प्रक्रिया सुरु केली आहे. महापालिका आयुक्तांनी 50 टक्के करवाढ मागे घेतली आहे. महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर अखेर मुंढे यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. मोकळ्या भूखंडावरील करवाढ पूर्णत: रद्द करतानाच नवीन वार्षिक भाडेमूल्य आकारणीत केलेली सुमारे तिप्पट वाढ पन्नास टक्क्यांनी मागे घेतली आहे. गुरुवारी (30 ऑगस्ट) महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत मुंढे यांनी आपल्या ३१ मार्च रोजीच्या अधिसूचनेत शुद्धीपत्रक काढण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून दरवाढ मागे घेतल्याचे सांगितले.

मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर 250 कोटी रुपयांची रस्त्याची कामे रद्द केली. तेथून वादाची ठिणगी पडली. नगरसेवक निधी रद्द करणे, त्रिसूत्रीच्या निकषावर नगरसेवकांची कामे नाकारणे अशा अनेक प्रकारांमुळे बेबनाव वाढत गेला. आयुक्तांनी परस्पर मिळकत करात अवास्तव वाढ केली, असा आरोप करीत नगरसेवकांनी विशेष महासभेतही करवाढ फेटाळली; मात्र आयुक्तांनी महासभेचा आदेशच बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यावर कडी केल्याने वादाचा तो कळस अध्याय ठरला. अनेकदा प्रयत्न करूनही आयुक्त तुकाराम मुंढे लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत अशी नगरसेवकांची भावना असून त्यामुळेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या.

 

Review