फ्लेक्स लावण्यावरुन वादातून पुण्यात दुकानदाराची हत्या...
पुणे (सहयाद्री बुलेटिन ) - सिंहगड रोडवरील माणिकबाग येथे एका दुकानदाराची हत्या दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरुन झालेल्या वादातून करण्यात आली आहे. पाचजणांनी तलवारीनं वार करुन निर्घृणपणे ही हत्या केली.
अक्षय अशोक घडसी (वय २४, रा. नॅशनल पार्क सोसायटी, माणिकबाग)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल अशोक घडसी यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी निलेश चौधरी, सागर दारवटकर व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय आणि आरोपी हे एकाच भागात राहतात. त्यांच्यात दहीहंडीचा फ्लेक्स लावण्यावरुन नुकताच वाद झाला होता. अक्षय घडसी हा किराणा दुकान चालवायचा. त्याचे धायरीत दुकान आहे. काल संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान बाहेर गेलेला अक्षय घरी परतला नाही. यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला एक तरुण पेट्रोल पंपाजवळ पडल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटली. दहीहंदीचा फ्लेक्स लावण्याच्या वादातून ५ जणांनी मध्यरात्री अक्षयवर तलवारीने वार करुन त्याची निर्घृण हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. आता सिंहगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.