संघर्ष कधी करायचा व कधी थांबवायचा हे शरद राव यांनी शिकविले ..... शरद पवार
पिंपरी (1 सप्टेंबर 2018) सह्याद्री बुलेटिन : कामगारांच्या हितासाठी नागरिकांना त्रास न होता वेळप्रसंगी आंदोलने, संप करून व्यवस्थापनाला व सरकारला भूमिका बदलविण्यास भाग पाडणारे कामगार नेते अशी शरद राव यांची ओळख होती. कामगारांच्या भल्यासाठी संघर्ष कधी करायचा आणि कधी थांबवायचा हे राव यांनी देशभरातील कामगार संघटनांना शिकविले. त्यांच्या विधायक दृष्टीकोनामुळेच तळेगावमध्ये कामगार व त्यांच्या मुलामुलींसाठी डॉ. राम मनोहर लोहिया विद्यापीठासारखी प्रशिक्षण संस्था उभी राहिली, हे अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय माजी मंत्री खासदार शरद पवार यांनी तळेगाव येथे काढले.
शनिवारी दि. 1 सप्टेंबर रोजी दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन आणि म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या वतीने तळेगाव दाभाडे येथे डॉ. राममोहन लोहिया समाजवादी विद्यापीठात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष मुंबई म्युनिसीपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. महाबळ शेट्टी, माजी खासदार विदुरा (नाना) नवले, आमदार संजय भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, मदन बाफना, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुंबई म्युनिसीपल मजदूर युनियनचे सचिव गोविंद कामतेकर, फेडरेशनचे कार्याध्यक्ष शशिकांत (बबन) झिंजुर्डे, नूर अहमद (कलकत्ता), देवेंद्र गौतम (राजस्थान), शंकर साळवी, सुरेश ठाकूर, साईनाथ राजाध्यक्ष, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मूर्तीकार संदीप मुंढे, निमंत्रक ॲड. सुखदेव काशीद, रमेश मालवीय, वामन कविस्कर, अशोक जाधव, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, आबा गोरे, संजय कुटे, अंबर चिंचवडे आदींसह राज्यभरातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदांचे कामगार प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
स्वागताध्यक्ष नवनाथ घाडगे यांनी सांगितले की, एका गरीब कामगाराच्या घरात शरद राव यांचा जन्म झाला होता. त्यामुळे कामगारांच्या वेदनांची जाणीव मनात ठेवुनच त्यांनी कामगार संघटनेचे काम पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ केले. कामगारांसाठी लढणारा शरद राव नावाचा हा युगपुरुष कामगार चळवळीच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले एक रत्न होते. जेंव्हा जेंव्हा कामगार आंदोलनात संभ्रम निर्माण होत असे, तेंव्हा शरद राव हे कामगार चळवळीला नवनिर्माणाच्या मार्गावर घेऊन जायचे. मुंबईसह देशातील एक अभ्यासू कामगार नेते म्हणुन त्यांची लोकप्रियता होती.
जलतरणपटू शाम शिंदे, मूर्तीकार संदीप मुंढे, महानगरपालिका फेडरेशनचे कार्याध्यक्ष बबन झिंजुर्डे, नाना ओरपे, तळेगाव नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचा खा. पवार यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. ॲड. महाबळ शेट्टी, सुखदेव काशीद, चित्रा जगनाडे, नूर अहमद, शंकर शेट्टी आदींनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन ज्योती आंबेकर यांनी केले. अशोक जाधव यांनी आभार मानले.