हाजी अरफात शेख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश

मुंबई (सह्याद्री बुलेटिन ) - शिवसेनेचे उपनेते व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे़. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन शेख यांनी पक्षात प्रवेश केला.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रेम दिले मात्र अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला नाही, फडणवीस यांनी समाजाला न्याय दिल्याची भावना शेख यांनी व्यक्त केली. शिवसेनेने आपल्याला उपनेते पद दिले.मात्र विधानपरिषदेचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात संधी दिली नाही. अल्पसंख्याक आयोगामध्ये देखील आपल्याला संधी डावलण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या कामाचे मुल्यांकन करून आयोगाचे अध्यक्ष पद देऊन अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवण्याची संधी दिली व अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे शेख म्हणाले.
रमजान महिन्यात माहीम दर्गाहचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांच्या सेहरी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत शेख यांची सलगी दिसल्याने मातोश्रीवरून त्यांना जाब विचारण्यात आला होता. मात्र विविध आश्वासनांची पूर्तता करण्यात सेना नेतृत्वाला अपयश आल्याने शेख यांनी भाजपचा रस्त्यावर चालणे अधिक श्रेयस्कर समजले.

Review