चक्क युकेजीत विद्यार्थी नापास: दाखला घेऊन जाण्याचा जयहिंद स्कूलचा दबाव

 
पिंपरी (सह्याद्री बुलेटीन) -पिंपरी कॅम्पातील जयहिंद प्राथमिक शाळेत युकेजी वर्गात शिकत असलेल्या हर्ष  रोचीरामाणी या विद्यार्थ्यास नापास केले आहे. त्याला वर्गात बसू दिले जात नसून, दाखला घेऊन जावे असे मुख्याध्यापिका सांगत आहेत. ‘आरटीई’ कायद्यातंर्गत या विद्यार्थ्याना शाळेत प्रवेश मिळाला असून, या प्रकारे शिक्षणाचा अधिकार नाकारण्याचा अधिकार नसल्याची तक्रार पालक राजेश रोचीरामाणी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
 
हर्ष रोचीरामाणी याचा प्रवेश ‘आरटीई’ कायद्यातंर्गत जयहिंद शाळेत झाला आहे. तो वर्षभर युकेजी वर्गात शिक्षण घेत होता. या वर्गात नापास केले जात नाही. मात्र, त्याला नापास करण्यात आले आहे. त्यामुळे पालकांना धक्का बसला आहे. आणि आता त्याला शाळेत प्रवेशही दिला जात नाही आहे. मुख्याध्यापिका राजमाता यांची भेट घेतली असता, त्यांनी विद्यार्थ्यांचा दाखला घेऊन जा आणि दुसर्‍या शाळेत प्रवेश घ्या, असे सांगितले आहे. मात्र, पालक रोचीरामाणी यांनी शाळेची आवश्यक फी भरण्याची तयारी दाखविली तरी, त्याला पाल्यास वर्गात बसू दिले जात नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.
 
यामुळे रोचीरामाणी कुटुंब मानसिक तणावामध्ये वावरत आहे. मुलांच्या शिक्षणाचे काय होणार, असे चिंता त्यांना सतावत आहे. मुलास शाळेत प्रवेश द्यावा अन्यथा शाळेसमोर सहकुटुंब उपोषण आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात मुख्याध्यापिका राजमाता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या बाबत त्यांनी शिक्षणमंत्री तावडे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय मानवाधिकार समिती, केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावेडकर आणि पोलिस ठाण्यास निवेदन दिले आहे.
 
 

Review