
'आज केरळ, उद्या कोकण?'_ या विषयावर ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे जाहीर व्याख्यान
पुणे ( सह्याद्री बुलेटिन ) : वनराई संस्थेच्या वतीने व्याख्यानमाला सुरु करण्यात येत आहे. शेती, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांशी निगडीत निरनिराळ्या समस्या, त्यावरील उपाययोजना, तसेच या क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या घडामोडीशी संबंधित विषय या व्याख्यानमालेच्या केंद्रस्थानी असणार आहेत. 'एक महिना - एक व्याख्यान' यानुसार प्रत्येक महिन्यामध्ये विशिष्ट विषयावर संबंधित क्षेत्रातील तज्ञाचे व्याख्यान आयोजित केले जाणार आहे. या व्याख्यानमालेचा शुभारंभ ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या व्याख्यानाने होणार आहे. 'आज केरळ, उद्या कोकण?' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असणार असून मंगळवार दि. ४ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता पत्रकार भवन (नवी पेठ, पुणे) येथील सभागृहात हे व्याख्यान आयोजित केले आहे.
नुकत्याच आलेल्या महापुराने केरळमध्ये हाहाकार माजवला. किनारपट्टीला असणाऱ्या राज्यांना यांसारख्या आपत्तींचा कायमच धोका असतो. ही आपत्ती नैसर्गिक होती खरी, परंतु यामध्ये झालेल्या विनाशास निसर्गात वाढत जाणारा मानवी हस्तक्षेपही कारणीभूत आहे का? आज केरळमध्ये उद्भवलेली परिस्थिती उद्या महाराष्ट्राच्या कोकणावरही ओढवू शकते का? कोणती कारणे आहेत यामागे? जाणून घेण्यासाठी जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ 'माधव गाडगीळ' यांचे 'वनराई' तर्फे आयोजित वनराई व्याख्यानमालेतील पाहिले व्याख्यान - "आज केरळ! उद्या कोकण?"