दोन पिढ्यांनाच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे या मागणीसाठी आंदोलन...
(सह्याद्री बुलेटिन ) - आरक्षणावर मर्यादा असावी, दोन पिढ्यांनाच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे. त्यानंतर त्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी करत आरक्षणाला विरोध करत सवर्ण समाजाने आज भारत बंदची हाक दिली आहे. याच धर्तीवर मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये हाय अलर्टचा इशाराही देण्यात आला आहे.सवर्णांकडून देण्यात आलेली भारत बंदची हाक पाहता मध्य प्रदेशमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्याकडेच पोलीस यंत्रणांची नजर राहणार आहे.सवर्णांनी पुकारलेल्या या भारत बंदमध्ये आंदोलनकर्त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था आपल्या हातात घेऊ नये असं सांगत त्यांनी शांततापूर्ण मार्गाने या बंदमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, जात आणि धर्माच्या आधारावर दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचा विरोध करत उत्तर प्रदेशातील नोएडा येथे मोर्चे निघण्याचीही चित्र आहेत. या भारत बंदमध्ये नोएडा लोक मंच (एनइए), द ब्राह्मण समाज सेवा समिती, द अग्रवाल मित्र मंडळ सहभागी झाल्याचं वृत्त ‘न्यूज नेशन’ने प्रसिद्ध केलं आहे.