सिद्धार्थ संघवी हत्याकांड, अपहरण करून हत्या, एक आरोपी गजाआड
मुंबई (सह्याद्री बुलेटिन) - बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या केल्याची कबुली एका आरोपीने दिली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या हत्याप्रकरणी सरफराज शेख या आरोपीला कोपरखैरणे येथील बोनकोडे भागातून अटक केली होती, त्याच्याकडून हत्येची कबुली देण्यात आल्याची माहिती आहे. संघवी यांचा मृतदेह हाजीमलंग रस्त्यावर टाकून दिल्याची माहिती सरफराज याने दिल्याने मुंबई पोलिसांनी हाजिमलंग परिसरामध्ये मृतदेहाची शोधाशोध सुरू केली असून अद्याप त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. दरम्यान, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी या अन्य तिघांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. संघवी यांच्या हत्येमागे नेमकं काय कारण होतं याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
संघवी यांचे लोअर परेल येथील कमला मिल येथे ऑफीस आहे. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयातून बाहेर पडले, मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत. सायंकाळी वेळेत घरी न पोहोचल्याने त्यांच्या कुटुंबियांनी एन. एम. जोशी मार्ग पोलिस स्थानकात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासात संघवी यांची चारचाकी गाडी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सापडली. गाडीच्या सीटवर रक्ताचे डाग आणि चाकू सापडला. या कारमध्ये पोलिसांना एका चाकूसह मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग आढळून आल्याने मुंबई पोलिसांसह नवी मुंबई पोलिसांनी देखील संघवी यांची कार कोपरखैरणे भागात आणणाऱ्याचा माग काढण्यास सुरुवात केली होती. अखेर कोपरखैरणेतील बोनकोडे भागात रहाणाऱ्या सरफराज शेख याने संघवी यांची कार तिथे आणल्याचे सीसीटीव्ही व मोबाइल संभाषणाच्या तांत्रिक तपासाद्वारे आढळून आले. तसेच या कारची चावी सरफराजच्या घरी आढळली. त्यामुळे पोलिसांनी त्याला रविवारी सकाळी ताब्यात घेतल्यानंतर त्याने संघवी यांच्या हत्येची कबुली दिली.
या हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.