पंतप्रधान आवासबाबत सहशहर अभियंता व सल्लागारांवर कारवाई करा: सामाजिक संघटनांची मागणी
पिंपरी (सह्याद्री बुलेटिन ) : पिंपरी - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फ राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथील निविदेचा प्रती. चौ. फुट दर हा शहरातील बांधकामाच्या बाजार भावाच्या दुप्पट दराने काढला आहे. सहशहर अभियंता राजन पाटील व कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी, सल्लागार शशांक फडके यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करून कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फ राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथील निविदेचा प्रती. चौ. फुट दर हा शहरातील बांधकामाच्या बाजार भावाच्या दुप्पट दराने काढला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल चुकीच्या पद्धतीने तयार केल्याने मनपाचे सुमारे १५० कोटी रुपयाचे नुकसान होणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरात सध्या बांधकामाचा प्रती. चौ. फुट दर हा १२०० ते १३०० रुपये सुरु आहे. या दारामध्ये चांगल्या प्रकारे बांधकाम होते. मात्र राजन पाटील, प्रदीप पुजारी व सल्लागार शशांक फडके यांनी चुकीचा (DPR) सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केल्याने चऱ्होली प्रकल्पाचा प्रती चौ. फुट दर २८४६ रुपये रावेत येथील गृह प्रकल्पाचा दर २९२७ रुपये तर बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पाचा दर २९७७ रुपये या प्रमाणे निविदा काढण्यात आल्या आहेत. यामुळे महापालिकेचे या तीन प्रकल्पात सुमारे १५० कोटी रुपयाचे नुकसान होणार आहे. हा करदात्या जनतेच्या पैशावर अधिकारी व सल्लागार यांचा एकप्रकारे डल्ला मारण्याचा प्रकार केला आहे.
या नुकसानीस जबाबदार असणारे महापालिकेचे स्थापत्य झो.नि.पु. चे सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता प्रदीप पुजारी यांना त्वरित निलंबन करा व त्यांची खाते निहाय चौकशी करा, तसेच प्रकल्प सल्लागार शशांक फडके यांना काळ्या यादीत टाका. असे न केल्यास आपल्या विरोधात महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी, असा इशारा रमेश वाघेरे, अमर कापसे, अनिल सोनावणे, संजय गायके, विजय ओव्हाळ, अमरजित यादव या विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.