स्वतःतील 'हिरा' ओळखण्यासाठी 'कम्फर्ट झोन' सोडा कृष्णप्रकाश; महाराष्ट्र अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी 'कॉम्पिटेटिव्ह प्लेअर ऍप'चे उद्घाटन
पुणे (सह्याद्री बुलेटीन) - "अभ्यासातील सातत्य आणि चांगली सांगत या गोष्टी आपण कटाक्षाने पाळाव्यात. आपली दृष्टी अर्जूनासारखी ध्येय निश्चित करणारी असावी. त्यातूनच येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याची क्षमता विकसित होते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा आवश्यक असते. आपल्या प्रत्येकामध्ये एक हिरा दडलेला असतो. त्याला पैलू पाडण्यासाठी आपण 'कम्फर्ट झोन'मधून बाहेर पडायला हवे," असा सल्ला सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी विद्यार्थ्यांना दिला.
रीडर्स क्लब एज्युकेशन ग्रुपच्या महाराष्ट्र अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या 'कॉम्पिटेटिव्ह प्लेअर ऍप'चे उद्घाटन झाले. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार आर. टी. देशमुख, सनदी अधिकारी धीरज मोरे, उद्योजक जितेंद्र सावंत, महाराष्ट्र अकॅडमीचे डॉ. अभिजित देशमुख, पंकज तोष्णीवाल आदी उपस्थित होते.
कृष्ण प्रकाश म्हणाले, "नोकरी मध्ये वेगळ्या पद्धतेने तुमच्यावर दबाव येतील त्याला योग्य उत्तर देता आला पाहिजे.आपल्या पदाचा, यशाचा अहंकार असता कामा नये. स्पर्धा परीक्षेत अपयश आले तर खचून न जाता इतर संधींसाठी प्रयत्न करावा. पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञान घेतले पाहिजे. आपण प्रशासकीय सेवेत का येतोय, याचे कारण स्पष्ट असायला हवे. एकदा सेवेत आल्यानंतर कर्तव्य, कायद्याच्या समान न्याय प्रामाणिक देशसेवा नागरिकांना समान वागणूक देण्यासाठी आपण बांधील असावे. स्वार्थासाठी किंवा कोणाच्या तरी हितासाठी आपण काम करू नये. संविधानातील हक्कांचे रक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे.
गिरीश बापट म्हणाले, "काळानुसार बदलणार्या गोष्टीचे ज्ञान घेतले पाहिजे. चांगली पुस्तके वाचण्यासह सकारात्मक विचार आणि वेळेचे योग्य नियोजन केले, तर जीवनात यशस्वी होता येते. संभाषण कला, ज्ञानाची आस असावी. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व अधिक प्रगल्भ होत जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत नवीन ज्ञान, कौशल्य आत्मसात करावीत."
धीरज मोरे म्हणाले, "फार पुस्तके वाचण्यापेक्षा महत्त्वाची वाचावीत. अभ्यासाचे योग्य नियोजन, टाईमपास टाळणे, तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग या गोष्टींवर भर असावा. चर्चेतून अभ्यास करावा. मात्र ती कशी आणि त्याचा उद्देश समजून घ्यावा."
पंकज तोष्णीवाल म्हणाले, "ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रश्नावली सोडविता येणार आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी १० सेकंदाचा वेळ दिला जाईल. १० सेकंदात उत्तर देणाऱ्याला पेटीएममार्फत 'रिवार्ड्स' मिळतील. अशा स्वरूपात विद्यार्थी या ऍपमधील प्रश्नोत्तरांची मजाही लुटतील व अनेक नवीन गोष्टी सहज शिकू शकतील."
विनायक कुलकर्णी आणि सायली काळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभिजित देशमुख यांनी आभार मानले.