पतीच्या प्रेयसीचं भूत त्रास देतेय म्हणून एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
पतीच्या माजी प्रियेसीचे भूत त्रास देतेय म्हणून एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
अहमदाबाद मधील कुणाल त्रिवेदी, कविता त्रिवेदी आणि 16 वर्षीय मुलगी शिरीन अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी राहत्या घरात तिघांचे मृतदेह आढळले होते. पोलिसांच्या हाती कविता त्रिवेदी यांची सुसाइड नोट लागली असून त्यामध्ये कुणाल त्रिवेदी यांच्या प्रेयसीचा उल्लेख करण्यात आला आहे. पतीच्या माजी प्रेयसीचं भूत कुटुंबाला त्रास देत असल्याचं कविता यांनी नोटमध्ये म्हटलं आहे. ४५ वर्षीय कुणाल यांनी गळफास घेतला होता. पत्नी कविता आणि मुलगी शिरीन यांचेही मृतदेह घरात सापडले होते. या दोघींनी विष पिऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कुणाल यांची आई बेशुद्धावस्थेत सापडली होती. त्यांनीही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र यातून त्या बचावल्या.
मला आणि माझ्या कुटुंबाला आत्महत्या करण्याची कोणतीही इच्छा नव्हती. पण काळ्या जादूचा प्रभाव कमी होणं शक्य नसल्याने दुसरा पर्याय शिल्लक नाही.असे कुणाल यांनी आपल्या नोटमध्ये लिहिलं.
कुणाल यांना आपल्या माजी प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं. मात्र कुटुंबाने त्यांच्या नात्याला नकार दिला होता. यामुळे नाराज झालेल्या कुणाल यांच्या प्रेयसीने आत्महत्या केली. तेव्हापासून प्रेयसीचं भूत आपल्या मागे लागलं असल्याचं कुणाल यांना वाटत होतं.असे कविता यांनी नोटमध्ये लिहिलं आहे.
८ सप्टेंबर रोजी कविता यांनी आपल्या ड्रायव्हरला तीन बॅगांसहित बहिणीच्या घरी पाठवलं होतं. यामध्ये कपडे, सोन्याचे दागिने आणि काही रोख रक्कम होती. या सगळ्याची किंमत १० लाख रुपये आहे. पोलिसांना संशय आहे की, कुटुंबाने आधीच आत्महत्या करण्याच ठरवलं होतं. त्यामुळेच त्यांनी आपल्याकडील महत्त्वाच्या गोष्टी बहिणीच्या घऱी पाठवून दिल्या होत्या.