अभ्यासाचा बोजा ५० टक्क्यांनी कमी करण्याचा विचार - प्रकाश जावडेकर

शाळांना कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागतंय याचा आढावा जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना घेण्यास सांगण्यात आला आहे, तसंच समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सध्याचा अभ्यासाचा बोजा ५० टक्क्यांनी कमी करण्याचा विचार गांभीर्यानं सुरू असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
जनप्रबोधिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.जनप्रबोधिनीच्या विकासात माजी विद्यार्थ्यांच्या असलेल्या वाट्याबद्दल जावडेकरांनी कौतुक केले. अन्य शाळांसाठी हा आदर्श असल्याचे ते म्हणाले. “अनेक विद्यार्थी उपकृत राहून त्यांच्या शाळांना सढळ हस्ते मदत करतात. जनप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी अजून शाळेच्या संपर्कात आहेत. शाळेची चांगली निगा राखावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत,” जावडेकर म्हणाले.
ई-लर्निंग किंवा डिजिटल सुविधा नसतानाही शाळांमधून विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्ये मिळत होती. परंतु आज सातवीतल्या मुलाला चौथीतली गणितं सोडवता येत नाहीत असा दाखला त्यांनी दिला. आम्ही लाखो मुलांची पाहणी करत असून प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदारसंघातील मुलांची काय स्थिती आहे ते कळवत आहोत असे जावडेकर म्हणाले. परंतु केवळ सरकारकडे या कामासाठी न बघता सगळ्या समाजानं एकत्र यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

Review