गोव्यात मुख्यमंत्री बदलाची शक्यता

सप्टेंबरच्या सहा तारखेला अमेरिकेहून गोव्याला परतल्यापासून पर्रीकर कार्यालयात गेले नसून ते घरीच विश्रांती घेत आहेत. ते उपचारासाठी गोव्यातल्या रूग्णालयात जात असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. केंद्रीय निरीक्षक गोव्यात दाखल होतील व पर्यायी नेतृत्वाची व्यवस्था करतील या मुळे मुख्यमंत्री बदलाची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.पर्रीकरांनी शुक्रवारी रूग्णालयाला भेट दिल्यानंतर राज्यातल्या अन्य नेत्यांना फोन केला तसेच मंत्र्यांना बोलावून घेतले. याआधी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पर्रीकर विधानसभा बरखास्त करतील व पुन्हा निवडणुकांची मागणी करतील असा दावा गव्हर्नर मृदुल सिन्हा यांना भेटून केला होता.
सध्या गोव्यामध्ये अत्यंत कमकुवत सरकार असून त्याचा परिणाम कामकाजावर होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तर पर्रीकरांची प्रकृती ठीक नसून ते पुन्हा अमेरिकेला उपचारासाठी जाणार असल्याची कुजबूज आहे.“पर्रीकरांकडे ९० खात्यांचा कारभार असून हे कसं काय स्वीकारता येऊ शकतं? त्यांच्या प्रकृतीची आम्हालाही काळजी आहे, पण सगळं सत्ताकेंद्र त्यांच्या हातात एकवटलं आहे. त्यांनी विश्रांती घ्यायला हवी. परंतु ते न करता ते सगळा कारभार स्वत:कडे ठेवत आहेत. स्वत:च्या मंत्र्यांकडेही ते जबाबदारी सोपवत नाहीत,” काँग्रेसचे नेते रमाकांत खलप म्हणाले.

Review