सीबीएसई परीक्षेत अव्वल आलेल्या १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

सीबीएसई परीक्षेत अव्वल आलेली विद्यार्थिनी १२ सप्टेंबरच्या दुपारी कनिना गावात शिकवणीला जाण्यासाठी बसथांब्यावर उभी असताना तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तिचं कारमधून अपहरण केलं. तिला शीतपेयामधून गुंगीचं औषध पाजलं आणि सीमेनजीकच्या शेतात तिच्यावर १२ जणांनी बलात्कार केला.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस तपासाला वेग आला असून चौकशीतून एक खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी लष्काराचा जवान असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. त्याचं नाव पंकज असल्याचं समजतं.
या प्रकरणाचा तपास हरयाणा पोलिसांचं विशेष तपास पथक करतंय. आम्ही गुन्हा नोंदवून घेतला असून तीन आरोपींची ओळखही पटली आहे. त्यांच्यापैकी एक जण लष्करात कार्यरत असून आम्ही त्याच्याविरोधात वॉरंट काढलं आहे, अशी माहिती हरयाणाचे पोलीस महासंचालक बी एस संधू यांनी दिली. दरम्यान, आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय.
या प्रकरणातील सर्व आरोपी पीडितेच्या कनिना गावातीलच आहेत. अपहरण आणि बलात्कारानंतर त्यांनीच तिला पुन्हा बसथांब्यावर आणून सोडलं होतं. इतकंच नव्हे तर, तुमची मुलगी बसस्टॉपवर बेशुद्धावस्थेत पडली असल्याचं त्यांनी पीडितेच्या घरी जाऊनही सांगितलं होतं.

Review