मी मंत्री आहे, मला पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या तरी फरक पडत नाही - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

मी एक मंत्री आहे, त्यामुळे मला मोफत पेट्रोल-डिझेल मिळतं, पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किमतींमुळे मला काही फरक पडत नाहीये, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये एका कार्यक्रमात आठवले बोलत होते.

इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे जनता मेटाकुटीला आली आहे हे मला समजतंय, माझं मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसेल, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी व्हायला हवे. माझ्या पक्षाचीही हीच भूमिका आहे. केंद्र सरकारही आता इंधनाचे दर नियंत्रणात आणण्याबाबत आता गंभीरतेने विचार करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर ही जबाबदारी सोपावण्यात आली आहे.

देशभरात पेट्रोल दरवाढीचं सत्र आजही सुरूच आहे. पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरांमध्ये 28 पैशांची तर डिझेलच्या दरांमध्ये 19 पैशांची वाढ झाली आहे. परिणामी मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर 89.29 रुपयांवर आणि डिझेलचा दर 78.26 रुपयांवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीतही पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाल्याने एक लिटर पेट्रोलसाठी 81.91 पैसे आणि डिझेलसाठी 73.72 रुपये मोजावे लागणार आहे.

Review