युवक कॉग्रेस प्रदेश अध्यक्षपदी तांबे, सरचिटणीसपदी जयस्वाल, तर शहराध्यक्षपदी  बनसोडे यांची निवड

पिंपरी (सह्याद्री बुलेटीन ) - प्रदेश युवक कॉंग्रेसच्या झालेल्या संघटनात्मक निवडणुकीत अध्यक्षपदी सत्यजीत तांबे यांची, पिंपरी-चिंचवडमधून  मयूर जयस्वाल यांची प्रदेश सरचिटणीसपदी  निवड झाली आहे. कॉंग्रेसच्या पिंपरी-चिंचवड जिल्ह्याला प्रथमच युवकाध्यक्ष म्हणून नरेंद्र बनसोडे यांचीनिवड झाली आहे.
 
कॉंग्रेसचे मावळते प्रदेश युवकाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्या टीममध्ये उद्योगनगरीतून कोणी नव्हते. यावेळी मात्र, तांबे यांच्या नव्या संघात जयस्वाल या खेळाडूचा समावेश झाला आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या निवडणुकीत जयस्वाल आणि बनसोडे हे दोघे दोन मोठ्या पदावर निवडून आले. त्यांचे प्रमोशन झाले आहे. बनसोडे हे पूर्वीच्या रचनेत युवकचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे, तर जयस्वाल हे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष होते. जिल्हानिहाय आणि अपंगासाठी राखीव जागा ठेवून प्रथमच प्रदेश युवक कॉंग्रेसची निवडणुक झाली. त्यामुळे ती वैशिष्ट्यपूर्ण ठरली. परिणामी पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्याची प्रदेश युवकमध्ये `एंट्री' झाली. राखीव जागेसाठी सक्रिय कार्यकर्ता व विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी असणे ही अट होती. ती पूर्ण केल्याने जयस्वाल निवडून आले. 
 
 
 
नुकत्याच झालेल्या व काल निकाल घोषित झालेल्या या निवडणुकीत चिंचवड,पिंपरी आणि भोसरी या शहरातील तिन्ही विधानसभा युवक अध्यक्षपदी अनुक्रमे संदेश बोर्डे, हिरा जाधव आणि नासीर चौधरी हे निवडून आले आहेत. शहर सरचिटणीस म्हणून विरेंद्र गायकवाड,कुंदन कसबे,गौरव चौधरी, करण गिल,अनिकेत आरकडे,रौनक तावडे,डॉ. स्नेहलता खोब्रागडे यांची निवड झाली आहे. 
 
या सर्वांचा आज पक्षाचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. `पक्षाच्या संघर्षाच्या काळात पक्षाची ध्येयधोरणे पोचविण्यासाठी युवकांना एकत्र करा,' असा सल्लाही त्यांनी दिला.

Review