तीन वर्षात मूर्ती दानात दुप्पटीने वाढ !

पिंपरी ( सह्याद्री बुलेटीन ) - प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्ती विसर्जनामुळे गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर नदी प्रदूषण होते. त्यात निर्माल्याचीही भर पडते. मात्र, गणेश मूर्ती व निर्माल्य दानाविषयी पिंपरी-चिंचवडकरांमध्ये जनजागृती वाढत आहे. मागील तीन वर्षातील मूर्ती दानाची संख्या पाहता दरवर्षी त्यामध्ये दुप्पटीने वाढ होत आहे. टाटा मोटर्सचा व्हालेंटिअरींग ग्रुप व संस्कार प्रतिष्ठानमार्फत राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमात आता महापालिका आणि शहरातील विविध संस्था, संघटना व विद्यालये सहभागी होवू लागल्याने ही एक चळवळ बनू लागली आहे.
मंडळांसह घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना होते. भक्तिमय वातावरणात दीड, पाचव्या, सातव्या, नवव्या आणि अनंत चतुर्थी दिवशी श्रींच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले जाते. काही वर्षापूर्वी केवळ शाडूच्या मातीच्या मूर्ती तयार केल्या जात असल्याने विर्सजनानंतर त्या पाण्यात विरघळत, मात्र आजकाल प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनविण्यास सुरुवात झाल्याने त्या पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे मूर्तीची विटंबना होते. शिवाय पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्यातून टाटा मोटर्सच्या व्हॉलेंटीअर्स ग्रुपने पुढाकार घेत 1996 पासून गणेश मूर्तीदान स्विकारायला सुरुवात केली. 2005 पासून संस्कार प्रतिष्ठानने या उपक्रमात सहभागी होत पुन्हा मूर्ती दान स्विकारायला सुरुवात केली.
सुरुवातीला संस्कार प्रतिष्ठान व टाटा मोटर्सकडून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा आता वटवृक्ष झाला आहे. हा उपक्रम आता शहरातील प्रमुख चार घाटांवर राबवला जात आहे. विशेष म्हणजे दीड दिवसांपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत हा उपक्रम राबवला जातो. सुमारे तीनशे ते चारशे स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होतात. काही संघटना घाटावर येवून मूर्तीदान उपक्रमाला विरोध करतात. त्यातून वादावादीचे प्रकार देखील घडले आहेत. मात्र, शहरवासियांच्या वाढत्या प्रतिसादामुळे हा विरोध तोकडा पडत आहे. गतवर्षी 30 हजाराहून अधिक मूर्तींचे दान मिळाले. तर दीड टनावरुन सुरु झालेले निर्माल्य संकलन 50 टनापर्यंत पोहचले आहे. त्यामुळे गणेश मूर्तीदान एक चळवळ बनू लागली आहे. विशेष म्हणजे गणेश मंडळ देखील मूर्तीदान करु लागली असून गतवर्षी 65 मंडळांनी मूर्तीदान केले होते. शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणीचे गणेशोत्सवात होणारे प्रदूषण रोखण्याच्या प्रयत्नांना यश येवू लागले आहे.
 
मूर्ती दानानंतर गणेशाचे काय होते?
नागरिक विसर्जनासाठी घाटावर आल्यानंतर कुत्रिम हौदात बाप्पांचे विसर्जन केले जाते. या मूर्ती तत्काळ पाण्यातून काढून घेतल्या जातात. काही नागरिक केवळ नदीच्या पाण्याचा मूर्तीला स्पर्श करुन मूर्ती दान करतात. या मूर्ती त्याच रात्री वाकड येथील विनोदेवस्तीवरील खाणीत नेल्या जातात. तेथे सर्व मूर्तींची एकत्रित आरती करुन विधीवत विसर्जन केले जाते. या वर्षी मूर्ती विसर्जनासाठी प्रथमच कन्व्हेअरची सोय संस्कार प्रतिष्ठानने केली आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रीक बेल्टच्या सहाय्याने बाप्पांचे थेट पाण्यात विसर्जन केले जाणार आहे. सुमारे तीनशे फूट खोल ही खाण आहे. पावसाच्या पाण्याने ती पुर्ण भरते. त्यामुळे विसर्जनात कोणतीही बाधा येत नाही, अशी माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांनी दिली.

Review