माओवाद्यांनी केली आजी आणि माजी आमदाराची हत्या,

हैदराबाद - रविवारी सत्तारूढ तेलगू देसमचे आमदार किदारी सर्वेश्वर राव (वय ४३ वर्षे) आणि माजी आमदार सावेरी सोमू यांची माओवाद्यांनी हत्या केली आहे. हे दोघेही आंध्र प्रदेश-ओडिशा सीमेवर ग्राम दर्शनी या सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होते. सुमारे ५० सशस्त्र नक्षलवाद्यांचा हल्ल्यात सहभाग असल्याचा अंदाज आहे. दरम्यान आंध्र-ओडिशा सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अराकू (राखीव) मतदारसंघाचे आमदार किदारी सर्वेश्वर राव आणि सोमू हे लिप्पिटीपुत्या या गावी पोहोचले असताना माओवाद्यांनी हल्ला केला. सर्वेश्वर राव २०१४ मध्ये वायएसआर काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते, मात्र नंतर तेलगू देसममध्ये प्रवेश केला होता. माओवाद्यांचा एक गट गावकऱ्यांसोबत आला आणि जमावाने राव यांची कार रोखली. राव यांचे खासगी सुरक्षा अधिकारी आणि माजी आमदार सोमू कारबाहेर आले असता त्यांनी एके-४७ रायफलीतून गोळ्या झाडल्या. राव आणि सोमू यांचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी सुरक्षा अधिकाºयांना नि:शस्त्र केले होते. माओवादी आंध्र-ओडिशा सीमा समितीचे सचिव रामकृष्ण यांच्या नेतृत्वात सुमारे ५० ते ६० दहशतवादी हल्ल्यात सहभागी असावेत, असा अंदाज विशाखापट्टणमचे पोलीस उपमहानिरीक्षक सी.श्रीकांत यांनी वर्तवला आहे.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू न्यूयॉर्कमध्ये असून, त्यांनी विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती मागितली आहे. उपमुख्यमंत्री (गृह) एन. चिना राजप्पा आणि पोलीस महानिरीक्षक (प्रभारी) हरीशकुमार गुप्ता यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

 

Review