आरक्षित रस्त्यांच्या भुखंडावरील बांधकामे पाडणार - महापौर राहूल जाधव
पिंपरी ( सह्याद्री बुलेटिन ) - शहराच्या विकास आरखड्यातील (डीपी) आरक्षित रस्त्यांवर अतिक्रमण करून बांधकामे झाली आहेत. त्यामुळे शहराच्या विकासात अडसर होत असल्याने या बांधकामांवर सरसकट कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती माहिती महापौर जाधव यांनी मंगळवारी (दि.25) पत्रकारांशी बोलताना दिली. तशा सूचना अधिका-यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
महापौर जाधव म्हणाले की. महापालिकेने प्रमुख रस्ते केल्यामुळे पिंपरी-चिंचवडचा विकास झाला असून अंतर्गत डीपी रस्ते विकसित करण्यात येणार आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार 12, 18, 24, 30, 45, 90 मीटर रस्त्यासाठी जागा आरक्षीत ठेवल्या आहेत. मात्र, यातील अनेक रस्त्यांच्या जागा पालिकेच्या ताब्यात नाहीत. काही प्रमुख रस्त्यांचा ताबा मिळवून ते रस्ते विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचा विकास झपाट्याने झाला आहे.
त्यापेक्षा अधिक विकास साधण्यासाठी शहरातील अंतर्गत डीपी रस्ते विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. आणखी किती डीपी रस्ते विकसित झाले नाहीत, याची माहिती नगररचना विभागाकडून मागविली आहे. माहिती हाती घेताच कारवाईचा आराखडा तयार केला जाईल. त्यानंतर डीपी रस्त्याच्या जागेतील अनधिकृत बांधकामे हटविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व प्रलंबीत डीपी रस्ते विकसित करण्यात येणार असल्याचे महापौर म्हणाले.