अशा कर्मचाऱ्याचे करायचे काय ?

सरकारी शाळा कॉलेज नको, सरकारी दवाखाना नको पण सरकारी नोकरी हवी कारण इतर ठिकाणी काम जास्त पण सुरक्षा आणि फायदे कमी असतात पण सरकारी कामात मात्र उलट स्थिती पाहायला मिळते, सध्या पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत हाच मुद्दा जास्त गाजत आहे, राजकीय मर्जीतील लोकांची नेमणूक, खाबुगिरी, वरदहस्त यामुळे कर्मचारी केवळ आळशीच बनलेत असे नाही तर काम टाळून बाकी सर्व करण्यावर भर असतो. कामाच्या वेळेत बाहेर फिरणारे, उपाहारगृहात तास न् तास गप्पांचे फड रंगवणारे, विनापरवाना गैरहजर राहणारे अशाप्रकारच्या सर्व कर्मचाऱ्यांची मंगळवारी एका मोहिमेद्वारे अचानक तपासणी घेण्यात आली. पालिका मुख्यालयातील या तपासणी मोहिमेत १०० हून अधिक कर्मचारी दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी पालिका मुख्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. पालिकेचे कामकाज सुरू होताच सकाळी दहापासून कर्मचारी बाहेरचा रस्ता धरतात. ते पुन्हा येण्याचे नावच घेत नाही. बहुतांश कर्मचारी उपाहारगृहात बसलेले असतात. अधिकारी वेळेवर येतच नाहीत. साईटवर असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अशा कामचुकारपणामुळे नागरिकांची कामे खोळंबतात. याविषयी सातत्याने तक्रारी झाल्या आहेत. तथापि, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यापूर्वी अचानक तपासणी केल्यानंतर बरेच कर्मचारी जागेवर नसल्याचे आढळून आले होते. मात्र, कडक कारवाई न झाल्याने हे प्रकार सर्रास सुरू होते. मंगळवारी सकाळी प्रशासन विभागाच्या वतीने तपासणी पथकाद्वारे अचानक पाहणी करण्यात आली. मुख्यालयातील सर्व विभाग तसेच उपाहारगृहांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. तेव्हा अनेक कर्मचारी दोषी आढळून आले. त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. काहीजण उशिरा आले तर काही विनापरवाना गैरहजर राहिले होते. कित्येकांनी पालिकेचे गणवेश घातले नव्हते. काहींनी ओळखपत्र बाळगले नव्हते.
असे गैरवर्तन करणारे १०० हून अधिक कर्मचारी आढळून आले आहेत. त्या कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या प्रमुखांना आहेत. पण अशा लोकांवर कारवाई होण्याची शक्यता कमीच आहे.

Review