पवारांनी मोदींची बाजू घेतल्याने तारिक अन्वर यांचा राष्ट्रवादीला राम राम...
राफेल विमान व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू घेतल्याने नाराज झालेल्या अन्वर यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला आहे. पक्ष नेतृत्वाबरोबर मतभेद झाल्यानंतर शरद पवारांबरोबर काँग्रेस सोडलेल्या मोजक्या नेत्यांपैकी ते एक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात शरद पवार, दिवंगत नेते पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांची भूमिका महत्वाची होती. राष्ट्रवादीचा ते उत्तर भारतातील प्रमुख चेहरा होते. परंतु, त्यांनीच राजीनामा दिल्याने हा पक्षाला मोठा धक्का आहे.
अन्वर म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे राफेल व्यवहारात सहभागी आहेत. त्यांना स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करता आलेले नाही. फ्रान्सच्या माजी अध्यक्षांच्या वक्तव्यामुळे राफेल व्यवहारात घोटाळा झाल्याचे सिद्ध होते. अशात शरद पवार यांनी मोदींचा केलेल्या बचावाशी मी असहमत आहे. त्यामुळे मी पक्ष आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. व्यक्तिगतरित्या मी पवार यांचा सन्मान करतो. पण त्यांचे हे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण आहे. या वक्तव्यामुळे मला धक्का बसल्याने मी हे पाऊल उचलले आहे.