राफेल जेट विमानांच्या व्यवहारात ७०० कोटी रुपये कुणाच्या खिशात गेले - संजय राऊत
बोफोर्स घोटाळ्यामध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नातेवाईकांना ६५ कोटी रुपयांची दलाली मिळाल्याचा आरोप करणारेच आता सत्तेत आहेत. त्यांच्या राफेल जेट विमानांच्या व्यवहारात ७०० कोटी रुपये कुणाच्या खिशात गेले आहेत?, त्यामुळे राफेल डील तर बोफोर्स घोटाळ्याचा बाप आहे. राफेल डीवरुन फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारनेच रिलायन्सचे नाव सुचवल्याचे उघड केल्यानतंर आता हे ओलांद राहुल गांधींचे हस्तक किंवा देशद्रोही आहेत असे मानायचे का? असा हल्लाबोल शिवसेनेच्या मुखपत्रातील एका लेखातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
रिलायन्सच्या अनिल अंबानी यांना या विमानांचे कंत्राट दिले हा प्रश्नच नाही तर ५२६ कोटींचा खरेदी व्यवहार मोदी सरकारच्या काळात १५७० कोटींवर गेलाच कसा याचे स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवे? म्हणजेच मधल्या व्यक्तीला यामध्ये प्रत्येक विमानामागे १००० कोटी रुपयांची दलाली मिळाली आहे, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. हा कसला सौदा आहे. भ्रष्टाचाराच्या पैशांमधून देशात निवडणुका लढवल्या जात आहेत. सरकारने बनत आहेत. निवडणुका लढवण्यासाठी पैसा उभा करण्यासाठी बोफोर्स आणि राफेलसारख्या व्यवहारांमधून पैसा उभा केला जातो हे देशाचे दुर्देव असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राहुल गांधी राफेलबाबत जे स्पष्टीकरण मागत आहेत त्यावरुन ते पाकिस्तानला मदत करीत असल्याचे भाजपा बोलत आहे. यापूर्वी ऐंशीच्या दशकात अशाच स्वरुपाचे आरोप बोफोर्स प्रकरणातही भाजपाने केले होते. त्यामुळे तेच आता पाकिस्तानला मदत करीत नाहीत का? असा सवालही राऊत यांनी विचारला आहे. त्यामुळेच भाजपा राफेल खरेदी प्रकरणातही घोटाळा झाल्याचे मान्य करीत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.