उत्तर प्रदेश पोलिसांना धक्का, तिवारींचा मृत्यू गोळी लागल्यानेच...
उत्तर प्रदेशमधील अॅपल कंपनीचे व्यवस्थापक विवेक तिवारी यांचा मृत्यू गोळी लागल्यानेच झाला, मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून यातून ही माहिती समोर आली आहे.
विवेक तिवारी हे शनिवारी आयफोन बाजारात दाखल करण्याचा कार्यक्रम आटोपून घरी परतत होते. त्यावेळी विवेक यांच्यासोबत त्यांच्या सहकारी साना खान देखील होत्या. ‘विवेक तिवारी यांनी पोलिसांना पाहून कार वेगाने पळवली. या नादात त्यांच्या कारचा अपघात झाला आणि यात विवेक तिवारी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला’, असा दावा संबंधित पोलिसांकडून केला जात होता. तर पोलिसांच्या गोळीबारात विवेक यांचा मृत्यू झाल्याचा जबाब साना खान यांनी दिला होता. अखेर शवविच्छेदनातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. विवेक तिवारी यांचा मृत्यू कानाजवळ गोळी लागल्यानेच झाला, असे शवविच्छेदनातून उघड झाले. ही गोळी अत्यंत जवळून झाडण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.