त्याने शेकडो लोकांचे प्राण वाचवले पण त्याच्या मदतीला कोणी आले नाही...शेवटी त्याचाच दुःखद अंत झाला...

ज्याने शेकडो लोकांना वाचवले, केरळमधील महापुरात अनेकांना मदत करून जो हिरो ठरला, वर्तमानपत्रांनीही ज्याच्या कार्याची दखल घेतली, अशा २४ वर्षीय तरुण जिनेशचा मात्र मदत न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
जिनेश हा मित्राबरोबर दुचाकीवरुन चालला होता. तोल गेल्याने दुचाकीचा अपघात झाला. यावेळी मागून येणारा ट्रक आपला वेग नियंत्रित करु शकला नाही आणि जिनेशच्या अंगावरुन निघून गेला. मदतीसाठी कोणीही थांबलं नाही. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला असताना जिनेश मदतीसाठी याचना करत होता. मात्र कोणीही त्याच्या मदतीसाठी पुढे आलं नाही अशी माहिती जिनेशच्या मित्राने दिली आहे.
अपघातानंतर रुग्णवाहिका पोहोचण्यास जवळपास अर्धा तास लागला. यानंतर दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आला. काही वेळाने जिनेशला मृत घोषित करण्यात आलं.
‘पुरावेळी जेव्हा मदत मागण्यात आली तेव्हा जिनेश आणि त्याच्या सहा मित्रांनी कशाचाही विचार न करता धाव घेतली होती’, जिनेशला डान्सची आवड होती. तुटलेल्या छप्परखाली तो मित्रांसोबत नेहमी प्रॅक्टिस करत असे. अनेकांनी ज्यांची जिनेशने महापुरातून सुटका केली होती, त्यांनी घऱी येऊन त्याचे आभार मानले होते. मात्र इतरांच्या मदतीला धावणाऱ्या जिनेशच्या मदतीसाठी कोणीच न आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

Review