मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत भारतीय...फोर्ब्स मॅगेझिनच्या श्रीमंताच्या यादीत अग्रस्थान...
फोर्ब्स मॅगेझिनच्या श्रीमंताच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या अंबानी यांची संपत्ती 47.3 अब्ज डॉलर्स आहे. या वर्षी संपत्तीत सगळ्यात जास्त भर पडणाऱ्यांमध्येही अंबानी यांचा समावेश असून त्यांच्या संपत्तीत एका वर्षात 9.3 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. रिलायन्स जिओनं अंबानींच्या श्रीमंतीला हातभार लावल्याचे दिसत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत भारतीय हे बिरूद सलग अकराव्या वर्षी कायम राखले आहे.
‘फोर्ब्स इंडिया रिच लिस्ट 2018’ मध्ये विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी 21 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत. तर 18.3 अब्ज डॉलर्ससह आर्सेलरमित्तलचे अध्यक्ष व सीईओ लक्ष्मी मित्तल तिसऱ्या स्थानी आहेत. प्रेमजी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन अब्ज डॉलर्सची तर मित्तल यांच्या संपत्तीत 1.8 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. सर्वात श्रीमंत अशा पहिल्या 10 जणांमध्ये शिव नाडर (14.6 अब्ज डॉलर्स), गोदरेज कुटुंब (14 अब्ज डॉलर्स), दिलीप संघवी (12.6 अब्ज डॉलर्स), कुमार बिर्ला (12.5 अब्ज डॉलर्स) व गौतम अदाणी (11.9 अब्ज डॉलर्स) या उद्योजकांचा समावेश आहे.