राम मंदिर बांधा अन्यथा पक्षाला रामराम - साक्षी महाराज

‘आज भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व आहे ते भगवान रामाच्या आशीर्वादामुळे आणि राम मंदिर आंदोलनामुळे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जर राम मंदिर बांधले नाही तर भाजपाच्या सदस्यतेचा राजीनामा देणार.’ असे शनिवारी भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी सांगितले.
‘दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर बांधण्यावरून सरकारला इशारा दिला होता. सरकारने त्याचा सन्मान करायला हवा. राम मंदिर हा भारतातील लाखो लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेत याबातचा कायदा मंजूर करून घ्यावा. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राम मंदिर बांधावे,’ असेही साक्षी महाराज म्हणाले.

दरम्यान, राम मंदिर बांधण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने मोदी सरकारला ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली असून, तोपर्यंत संसदेत कायदा झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचे स्पष्ट संकेत विश्व हिंदू परिषदेने दिले. ‘विहिंप’ने उच्चाधिकार समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीच्या माध्यमातून मोदी सरकारवर दबाव वाढण्याचा प्रयत्न केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही कायदा मंजूर करून घेता येऊ शकतो. त्यामुळे २०१८च्या अखेपर्यंत राम मंदिर उभारणीतील सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकेल. तसे नाही झाले तर धर्मसंसदेत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल, असे ‘विहिंप’चे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Review