राहुलजी अभ्यास करून बोला- राहुल गांधींना गडकरींचा पलटवार
एका कार्यक्रमादरम्यान मी जे बोललो त्याचे संदर्भ वेगळे होते, यात कुठेही नरेंद्र मोदीजी किंवा भारत सरकारचा उल्लेख नव्हता तसेच १५ लाख रुपयांचा विषयही आला नाही, तरीही दिल्लीतील एका वर्तमान पत्राने एक टेबल न्युज दिली, हि बातमी राहुल गांधी यांनी पहिली आणि ट्विट केले, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहुल गांधी यांना अभ्यास करून बोलण्याचा सल्ला दिला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचार करताना आम्ही सत्तेत येऊ असे वाटले नव्हते. त्यावेळी काही जणांनी आश्वासने द्यायला सांगितली. आम्ही एवढी आश्वासने दिली की ती आता आठवतही नसल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गडकरींवर टीका केली होती. दरम्यान नितीन गडकरी यांनी आपल्या वक्तव्यामधून काहींनी चुकीचा अर्थ काढला असून, राहुल गांधींनी आधी मराठी शिकून घ्यावं असा टोला लगावला आहे. राहुल गांधींना कधीपासून मराठी कळायला लागलं, असा खोचक सवालही त्यांनी यावेळी विचारला.