प्लास्टिक आढळून आल्यास दुकानाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय...

कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा बांधून देण्यासाठी प्लास्टिक आढळून आल्यास तातडीने दुकानाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय पर्यावरण विभागाने घेतला असून, तसे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. बैठकीला पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई-रविंद्रन, महानगरपालिकांचे आयुक्त, उपायुक्त, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पालिकांचे मुख्यधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पर्यावरण व प्रदूषण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील प्लास्टिक बंदीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत कदम यांनी हे आदेश दिले. त्यावेळी पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील उपस्थित होते. राज्यात ई-कॉमर्सद्वारे होणाऱ्या उत्पादन वितरणासाठी लागणाऱ्या प्लास्टिकला फक्त तीन महिन्याकरिता विक्री करण्यास मुभा दिली होती. ती मुदत संपल्याने बांधणीसाठी प्लास्टिकऐवजी अन्य पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे अपेक्षित आहे.
आतापर्यंत राज्यात २९० टन प्लास्टिक जप्त झाले असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देखील महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले आहे.

Review