मुख्यमंत्र्यांसह अर्धे सरकार हे नागपूर-विदर्भातले तरी नागपूर असुरक्षित कसे ? नेहमीप्रमाणे शिवसेनेचा भाजपाला सवाल
भीमा-कोरेगाव दंगल व त्यानंतर पुकारलेल्या बंदमध्ये प्रचंड हिंसाचार झाला. मराठा क्रांती आंदोलनातही काही ठिकाणी हिंसक घटना घडली. मुंबईत दिवसाढवळ्या खून व हिंसक हल्ले झाले. मानखुर्दचे आमदार तुकाराम काते यांच्यावर खुनी हल्ला झाला. असे प्रकारण मुंबईत वाढू लागले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे सध्या नागपूरमध्ये होत आहेत. नागपूरच्या प्रतिमेला तडा गेला आहे. मुख्यमंत्र्यांसह अर्धे सरकार हे नागपूर-विदर्भातले असून तरीही उपराजधानी असुरक्षित कशी?. त्यामुळे हेच लोण आता मुंबईकडे पसरू लागले आहे. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या गृहखात्याला लक्ष्य केले आहे.आपल्या लेखात शिवसेनेने म्हटले की, गेल्या दोन-चार वर्षांत मुंबईची दुरावस्था झाली आहे. सर्वच बाबतीत मुंबईवर जे अधिकारी लादले गेले ते फक्त ओरबडण्यासाठी व वाट लावण्यासाठीच. हा नवा ‘समृद्धी मार्ग’ सर्वच सरकारी खात्यांत सुरू झाला आहे.पंतप्रधान मोदींच्या जिवास धोका असल्याची गुप्त वार्ता आमच्या पोलिसांना समजते, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे ‘बॉम्ब’ ठेवल्याची माहिती मिळते, पण आमदारावर हल्ले होणार आहेत किंवा रस्त्यावर कुणाला गोळ्या घालणार आहेत हे पोलिसांना कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. मुंबईत सध्या ‘मेट्रो’ची वारेमाप कामे काढली आहेत. हे सर्व ठेकेदार नागपुरातूनच मागवले आहेत असा अनेकांचा दावा आहे. त्यांना वरून आशीर्वाद असल्याने संपूर्ण मुंबईत त्यांचा हवा तसा उत्पात सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार लेकी-सुनांना पळवून न्यायची भाषा करतात. त्यांना पोलिसांचे संरक्षण मिळते, पण ‘मेट्रो’च्या झुंडशाहीवर जाब विचारणार्या आमदार कातेंवर खुनी हल्ला होतो. आमचे रक्त सांडून तुमचे खिसे भरणारा ठेकेदारी संस्कृतीचा विळखा महाराष्ट्राच्या सरकारला पडला आहे.