कागदी घोडे नाचविण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करुन जनतेला दिलासा द्यावा - सुप्रिया सुळे
राज्यात भयंकर दुष्काळ असतानाही केवळ शब्दांचे खेळ करत दुष्काळसदृश परीस्थिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. दुष्काळाने जनता होरपळतेय, कृपया, कागदी घोडे नाचविण्यापेक्षा तातडीने दुष्काळ जाहीर करुन जनतेला दिलासा द्या, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.अपुऱ्या पावसामुळे निम्म्या राज्यावर भीषण दुष्काळाची छाया पसरली असून राज्याच्या तब्बल १८० तालुक्यांतील सुमारे २० हजार गावांत सरकारने मंगळवारी टंचाईसदृश परिस्थिती जाहीर केली. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली.
राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून सोमवारी पुण्यात अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.